पोलीस प्रवाह न्युज
लाटवण/मंडणगड . दि. १५ – जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे आदेशाने सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठीच्या मंडणगड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण १४ जुलै रोजी कायम करण्यात आले. याकरिता मंडणगड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात तहसिलदार अक्षय ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सोडतीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमास मंडणगड निवासी नायब तहसिलदार संजय गुरव या अधिकाऱ्यांसह तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण सोडतीमध्ये सरपंच पदाचे आरक्षणासाठी २०११ च्या लोकसंख्येच्या प्रमाणातील नमुद प्रवर्गाची टक्केवारी लक्षात घेण्यात आली आहे. त्यानुसार अनुसुचित जाती प्रवर्गासाठी दहागाव व सोवेली या ग्रामपंचायती राखीव झाल्या, यात सोवेली या ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण पडले. अनुसुचीत जमाती प्रवर्गासाठी कादवण, तिडे – तळेघर व घोसाळे या ३ ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या. यातील कादवण ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण पडले.
नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी तेरा ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या. यातील बाणकोट, भोळवली, दाभट, जावळे, पाट, विन्हे, तुळशी या ग्रामपंचायतीमध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव हे आरक्षण पडले. तर भिंगळोली, लाटवण, मुरादपुर, उमरोली, वाल्मिकीनगर, लोकरवण या ग्रामपंचातीमध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण हे आरक्षण पडले.

खुल्या प्रवर्गासाठी दुधेरे बामणघऱ, कुडुकखुर्द, माहू-बोरघर, पणदेरी, पालघर, पालवणी, पिंपळगाव, पाले, शिरगाव, सावरी, तोंडली, उन्हवरे, उंबरशेत, वेळास, वलौते, अडखळ या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव हे आऱक्षण पडले. तर घराडी, बहिरवली, कुंबळे, म्हाप्रळ, वेसवी, चिंचघर, कोंडगाव, निगडी, पेवे, पिंपळोली, पडवे, शिगवण, सडे, देव्हारे, गोठे या ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. जनतेतून थेट सरपंच होणार असल्याने अनेक राजकीय पक्षांची उमेदवार चाचपणी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर घेतल्या जात नसल्या तरी राजकीय पक्ष मूळ पाया म्हणून ग्रामपंचायत निवडणुकडे पाहत असतात. ह्यामुळे मंडणगड तालुक्यात विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी उमेदवार शोधण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.




































