पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १८- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने शेकाप पक्षाला मोठा धक्का दिला आहे. माणगाव तालुक्यातील शेकाप नेते जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी अस्लम राऊत हे शेकापला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दि. १८ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत पक्ष प्रवेशाची घोषणा केली असून अस्लम राऊत यांचे स्वागत केले आहे.
माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू चेअरमन तथा प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेला रा. कॉ. प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, चंद्रशेखर (बाबूशेठ) खानविलकर, युवक अध्यक्ष शादाब गैबी, कृषी उत्पन्न बाजार समिती मा. सभापती रमेश मोरे, माणगाव नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, अल्ताफ धनसे, शेखर देशमुख, तालुकाध्यक्ष बाळाराम काका नवगणे, महिला तालुकाध्यक्ष संगिता बक्कम, तालुका कार्याध्यक्ष ॲड. सुशिल दसवते, शहर अध्यक्ष सुनील पवार, रविंद्र मोरे, खरवली सरपंच संतोष खडतर, नगरसेवक कपिल गायकवाड, दिनेश गुगळे, सिद्धांत देसाई आदी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व अस्लम राऊत समर्थक उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार व मार्गदर्शक खा. सुनिल तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून जिल्हा परिषद माजी सदस्य, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक अस्लम राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासात्मक विचारधारा आहे. स्थानिक पातळीवर काम करत असताना जर मजबूत नेत्यांची जोड मिळाली तर विकासकामे अधिकाधिक करता येतात. माणगाव तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश सुरूच आहेत. अस्लम राऊत यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने मोर्बा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार आहे. माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे आणण्यासाठी योग्य ती पावले उचलून पक्षाची ताकद वाढवतील.
यावेळी प्रवेशकर्ते अस्लम राऊत म्हणाले की, खा. सुनील तटकरे यांच्यासोबत विकासकामांबाबत चर्चा केली असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासकामे होतील याची खात्री झाल्याने सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांच्या सोबत घरचे संबंध असून ते संबंध यापुढेही तसेच राहतील. मोर्बा जिल्हा परिषद गणातून राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी व विकासकामांचे आश्वासन देण्यात आल्याचे यावेळी अस्लम राऊत यांनी सांगितले.



































