पोलिस प्रवाह न्युज
चिपळूण- दि. २८- तालुक्यातील परशुराम शिक्षण संस्था रजि. मुंबईचे अडरे येथील पी. के. सावंत माध्यमिक विद्यालयातील २००५- ०६ च्या दहावी बॅचचा स्नेहमेळावा आजी-माजी शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रत्यक्ष शाळेत जाऊन शालेय जीवनातील आठवणींना नवा उजाळा देत तब्बल २० वर्षानंतर दिमाखदार स्नेहमेळावा करणारी माजी विद्यार्थ्यांची ही पहिलीच बॅच ठरली. या बॅचच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल शिक्षकांनी अभिनंदन केले. या स्नेहसंमेलनात ५५ माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात घंटा वाजवून शाळा भरविण्यात आली. राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्व माजी विद्यार्थी शाळेत एकत्र बेंचवर बसले. वर्गशिक्षक म्हणून जबाबदरी घेतलेल्या सुषमा इंदूलकर मॅडम यांनी क्रमवारी हजेरी घेतली.
संस्थेचे अध्यक्ष प्रदीपभाई कदम यांच्या दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक डी. बी. शिंदे यांच्या हस्ते सरस्वती व शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या मेळाव्यात सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी थोडक्यात आपला परिचय करुन दिला. या मेळाव्यासाठी सहकार्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याबद्दल यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सर्व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त करताना जुन्या आठवणी ताज्या करुन एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांतर्फे विद्यालयाला स्नेहार्द भेट म्हणून भांडी देण्यात आली.या स्नेहमेळाव्याला संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कदम, मुख्याध्यापक डी.बी. शिंदे, आर.जी. कदम, एस.एस. शिंदे, जयप्रकाश खेडेकर, दत्ताराम निर्मळ, संदीप काणेकर, सुषमा इंदूलकर, ललिता पेढामकर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात पिंपळीतील फार्म हाऊसवर स्नेहभोजन झाले. स्नेहभोजनानंतर एकमेकांच्या माहितींची देवाणघेवाण झाली. गप्पा सुरु झाल्या. आपलं लग्न, जोडीदार, ते निभावणं याबद्दल सगळ्यांनी आपापले विचार व्यक्त केले. प्रत्येकजण आपापल्या कहाण्या सांगण्यास उतावीळ झाले होते. बोलता बोलता थट्टा मस्करीही केल्या. कोणी लाजत लाजत तर कोणी मनमोकळेपणानं व्यक्त झालं. त्यानंतर नाच, गाणी, मित्र मैत्रिणीसोबत सेल्फी फोटो काढण्यात माजी विद्याथ मग्न झाले होते. या स्नेहमेळाव्याला जे येऊ शकले नाहीत, त्यांनी फोनवरून व्हीडीओ कॉलद्वारे गप्पा मारल्या. शेवटी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना ग्रुप फोटोची फोटो फ्रेम स्नेहार्द भेट म्हणून देण्यात आली. ही एकत्र फोटो फ्रेम बघताना विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. सर्व विद्यार्थ्यांनी केक कापून कार्यक्रमाचा समारोप करीत दरवर्षी स्नेह मेळावा करण्याचा निर्धार केला. या स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक तसेच आभार पत्रकार देवेंद्र जाबरे यांनी मानले. या स्नेहमेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सिद्धांत निर्मळ, योगेश नाचरे, रोशन कांबळी, देवेंद्र जाबरे, प्रवीण पवार, तुषार जाबरे, मुन्नावर खान, अभिजीत राजेशिर्के, नितीन लंबाडे, प्रथमेश जाधव, प्रशांत राणे, प्रवीणा कवलकर, श्वेता पवार, आरती कांबळी, शिल्पा लाड तसेच ग्रुपमधील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.




































