पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ६- तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळा, उणेगाव येथे पारंपरिक पद्धतीने शारदोत्सव मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी विविध बौद्धिक, सांस्कृतिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व आपली कलात्मकता व ज्ञान कौशल्ये सादर केली.
शारदोत्सवाच्या प्रारंभी पानाफुलांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी पानाफुलांच्या आकर्षक रांगोळ्या साकारल्या. रंगीबेरंगी सजावट व प्रसन्न वातावरणामुळे शाळा एकदम छान सजली होती. हस्ताक्षर व श्रुतलेखन स्पर्धा-विद्यार्थ्यांनी अचूक लेखन व सुलेखनाची उजळणी करून आपली भाषा समज व एकाग्रता दाखवून दिली. मराठी व इंग्रजी शब्द आठवून लिहिणे, स्पेलिंग पाठांतर व लेखन स्पर्धा यामधून विद्यार्थ्यांचे भाषिक ज्ञान व स्मरणशक्ती तपासली गेली. AI प्रश्नमंजुषा व जनरल नॉलेज स्पर्धा AI तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना अचूक उत्तरे देऊन आपले सामान्यज्ञान सिद्ध केले.मुलांना अगदी कौन बनेगा करोडपती सारखा अनुभव घेता आला. उलट उजळणी व पाढे पाठांतर स्पर्धा-यामधून गणित विषयातील पाढ्यांची उजळणी मनोरंजक पद्धतीने झाली. चित्रकला व रंगभरण स्पर्धा लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी कल्पकतेने विविध चित्रे काढून त्यात रंग भरले. मराठी व इंग्रजी कविता सादरीकरण- विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने विविध कविता सादर केल्या, काहींनी स्वतःच्या रचनाही सादर केल्या. वक्तृत्व स्पर्धा “महात्मा गांधी” व “स्वच्छतेचे आपल्या जीवनातील महत्त्व” या विषयांवर विद्यार्थ्यांनी स्फूर्तिदायक विचार मांडले. वेशभूषा स्पर्धा व गरबा विविध भूमिका साकारत विद्यार्थ्यांनी सुंदर वेशभूषा सादर केल्या, तर संगीताच्या तालावर गरबा खेळत मुलांनी सांस्कृतिक नृत्याचा आनंद घेतला. भोंडला- पारंपरिक गाण्यांनी साजरा झालेला भोंडला विद्यार्थ्यांना आनंद देऊन गेला.
या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकतेबरोबरच आत्मविश्वास, सर्जनशीलता, सांघिक भावना, भाषिक आणि बौद्धिक कौशल्ये विकसित झाली. विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांनी आपले दडपण बाजूला ठेवून मुक्तपणे सहभाग घेतला. या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन,अचूक नियोजन व समन्वय महत्त्वाचा ठरला. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षकांच्या प्रेरणेमुळे शक्य झाले. या उत्सवात पालकांनीही विशेष रस घेतला. आपल्या पाल्याची योग्य तयारी करून घेणे व स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांनीही मोलाची भूमिका बजावली.काही स्पर्धांमध्ये त्यांनी प्रेक्षक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शारदोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभागी होत आपल्या अंगभूत कलागुणांना वाव दिला. शिक्षणासोबतच असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावतात, हेच या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तथा बीट विस्तार अधिकारी कुमार खामकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच माणगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.



































