पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. २४- सरपडोह तालुका करमाळा येथील देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भात विचार विनिमय करण्याकरिता मंत्रालयीन पातळीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या दालनामध्ये दि. ३० सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण व स्वतंत्र बैठक आयोजित केली असल्याची माहिती भाजपा जिल्हा युवा नेते व मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बागल म्हणाले की, मौजे सरपडोह या गावांमध्ये गेल्या १२ ते १४ वर्षापासून जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार बंद असून वारस नोंदी घरकुलांचे व इतर शासकीय लाभ वाडी वस्तीवर हातपंप घेणे शिवाय पीक कर्ज घेणे याबाबतही अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासोबत अनेक शासकीय सुविधा देता येणे शक्य होत नाही. देवस्थान इनाम जमीन अशी नोंद असल्यामुळे नागरिकांचे व जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत सरपडोह येथील ग्रामस्थांनी विविध स्तरांवर निवेदने व मागण्या केल्या. परंतु, अद्याप त्याला यश आले नव्हते. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपा जिल्हा परिषदेच्या गटनेत्या व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मीदिदी बागल यांनी एक स्वतंत्र पत्र दिले त्यानुसार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी दिनांक ३० सप्टेंबर रोजी मंत्रालयीन दालनात महत्त्वपूर्ण व स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. मौजे सरपडोह तालुका करमाळा येथील येथील जमिनींवरील निर्बंध हटवणे बाबत अनेक वेळा वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कोणती कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत दि. ३० सप्टेंबरच्या बैठकीत निश्चितपणे ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा यावेळी भाजपा युवा नेते दिग्विजय बागल यांनी व्यक्त केली. या बैठकीसाठी मौजे सरपडोह तालुका करमाळा येथील एक शिष्टमंडळ मुंबईला घेऊन जाणार असल्याची माहिती ही शेवटी दिग्विजय बागल यांनी दिली.










































