पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. ९ – उजनी जलाशयात ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेल्या २८ वर्षीय बेवारस महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून करमाळा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मौजे बिटरगाव (वांगी), ता. करमाळा, जि. सोलापूर येथे नागनाथ रासुंडे यांच्या शेताजवळ उजनी जलाशयात एका महिलेचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मयत रजि. नं. १२९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयताची ओळख पटत नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी ५ विशेष पथके तयार केली. ही पथके सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, पुणे ग्रामीण, पुणे शहर, अहिल्यानगर, धाराशिव, बीड, लातूर अशा विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती.
सीसीटीव्हीने दिला सुगावा
तपासादरम्यान उजनी धरणातील बंदगर वस्ती, ढोकरी ते शहा (ता. इंदापूर) येथे लाँच/बोटीने प्रवास करणाऱ्या लोकांकडे आणि मच्छीमारांकडे विचारपूस केली असता, एका महिलेबाबत थोडी माहिती मिळाली. त्यानंतर त्या लाँचच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, मृत महिलेच्या अंगावरील कपडे आणि लाँचमध्ये दिसणाऱ्या एका महिलेच्या अंगावरील कपडे एकच असल्याचे स्पष्ट झाले.
त्यावरून अधिक तपास केला असता सदर महिला ही किर्ती रामचंद्र ढावरे (वय २६, रा. वांगी नं. ९, ता. करमाळा) असल्याचे निष्पन्न झाले.
बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानेच खून?
तपासात असे समोर आले की, किर्ती ढावरे हिने वांगी गावातील भगवान महादेव कांबळे याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी केस मागे घेण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात भगवान कांबळे याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले.
भगवान कांबळे याने आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या बलात्काराच्या केसची फिर्यादी असलेल्या किर्तीचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी मयताची आई रूपाली सुखदेव चांदगे (रा. कांदलगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १००३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), २३८(ए), २३८(बी), ३५१(२) अन्वये दि. ०७/११/२०२६ रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन तासात आरोपी जेरबंद
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि कसोशीने तपास करून अवघ्या दोन तासात आरोपी भगवान महादेव कांबळे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर हे करीत आहेत.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, उपनिरीक्षक संदीप बनकर, पोहेकॉ दुष्यंत ढंबरे, अलिम शेख, मयुर गव्हाणे, पोना चंद्रकांत गोरे, गणेश शिंदे, अर्जुन गोसावी, योगेश येवले, अमोल बागल आणि सायबर पोलीस ठाण्याचे जहीरन नाईकवाडी यांनी केली आहे.












































