दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाभावी उपक्रमाची सुरुवात
पोलीस प्रवाह न्युज
पुणे, दि. ६- दिव्यांग मुलांच्या शिक्षण, आरोग्य, उपचार, पुनर्वसन आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने बी. जी. सर फाउंडेशनचा शुभारंभ पुणे येथे दि. १ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात आला.
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रा. बी. जी. कुलकर्णी (बी. जी. सर) यांच्या कार्यातून प्रेरणा घेत स्थापन झालेल्या या फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना आवश्यक वैद्यकीय सेवा, शिक्षण, थेरपी, स्पीच थेरपी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मार्गदर्शन व सामाजिक आधार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
फाउंडेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ कुलकर्णी, अध्यक्षा डॉ. श्रुती कुलकर्णी, उपाध्यक्षा सपना बढे, खजिनदार दत्तात्रय गंगणे तसेच विश्वस्त दीपक सरगड, कविता सरगड आणि आशिष पदमने यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
उद्घाटन सोहळ्यात फाउंडेशनच्या आगामी कार्याची दिशा, उद्दिष्टे आणि समाजातील गरजू मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. “From Inertia to Momentum – From Limitation to Possibility” या प्रेरणादायी विचारातून प्रत्येक मुलाच्या क्षमतेला योग्य संधी देण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, हितचिंतक आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दिव्यांग मुलांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तर समान संधी, सन्मान आणि आत्मविश्वासाने पाहण्याची गरज आहे. या विचारातून बी. जी. सर फाउंडेशन आगामी काळात अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी कार्य करणार आहे.
फाउंडेशनच्या या सेवाभावी कार्याला समाजातील नागरिक, संस्था आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
— बी. जी. सर फाउंडेशन, पुणे













































