पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ८- तालुक्यातील दानशूर काळे परिवाराने पुन्हा एकदा समाजाप्रती असलेली आपुलकी, ममत्व आणि जिव्हाळा सिद्ध केला आहे. गरजू रुग्णांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या या कुटुंबाकडून उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे जीवनावश्यक औषधसामुग्री देण्यात आली आहे.
चारिझेन फाउंडेशन उपाध्यक्ष सतीश काळे कुटुंबाने मुलगी स्वरा काळे हिच्या वाढदिवसानिमित्त २४०० गोळ्या, २१४० इंजेक्शन्स, २५० शुगर स्ट्रीप्स अशी अनमोल देणगी देत समाजासाठी नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या सहानुभूतीची, समाजकार्यातील निष्ठेची शिकवण त्यांनी आपल्या मुलींमध्ये दिली आहे. समाजाबद्दल संवेदनशीलता आणि गरजूंवरील ममत्व या मूल्यांवर वाढलेल्या या काळे कुटुंबाने दानधर्माचा अनोखा मार्ग निवडून खऱ्या अर्थाने वाढदिवसाची अनमोल भेट दिली. या सदिच्छा दानासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष खाडे यांनी प्रेरणा दिली.
दान केलेली औषधे कर्तव्यदक्ष डॉ. अरुणा पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी डॉ. दिपक देशमुख, गवळी सिस्टर, हॉस्पिटल कर्मचारी अनिल तेटगुरे, संतोष सिताराम खाडे, काळे कुटुंब, रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. रुग्णालयात या उपक्रमाचे मनापासून स्वागत करण्यात आले. समाजाप्रती असणारी संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तसेच यावेळी स्वरा सतीश काळे हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आशीर्वाद देण्यात आले.




































