पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. १५- करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत असताना सध्या सुरू असलेले सायंकाळच्या वेळेचे वीज भारनियमन तातडीने रद्द करावे, अशी मागणी भाजपा युवा नेते तथा मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय दिगंबरराव बागल यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
करमाळा तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ग्रामीण भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक मध्यम प्रकल्प व तलावांमध्ये अद्याप समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांच्या हातातील पिके गेली आहेत. रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेला पाऊसही अद्याप झालेला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कशीबशी जगविलेली पिके वाचविण्यासाठी वीज अत्यंत महत्त्वाची असताना भारनियमनामुळे त्यांचे आणखी नुकसान होत असल्याचे बागल यांनी निवेदनात नमूद केले आहे.
गौरी-गणपतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळचे भारनियमन ग्रामीण जनतेसाठी त्रासदायक ठरत आहे. सायंकाळच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक, विद्यार्थी, महिला, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तसेच अंधाराचा फायदा घेऊन चोरीसारखे प्रकार घडण्याची शक्यता असल्याने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे बागल यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची अडचण आणि सणासुदीचे दिवस लक्षात घेता करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील सायंकाळचे वीज भारनियमन रद्द करून नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी दिग्विजय बागल यांनी केली आहे. महावितरण व शासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.












































