पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. १४ – रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात प्रस्तावित ‘बल्क ड्रग पार्क’ आणि रासायनिक कंपन्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून, बल्क ड्रग पार्क विरोधी संघर्ष समिती आणि भूमीपत्र व स्थानिक ग्रामस्थांसह सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून जमीन संपादित करताना इंजिनिअरिंग व ऑटोमोबाईल उद्योग आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता त्याच जागेवर रासायनिक उद्योगांचा समावेश असलेला बल्क ड्रग पार्क उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबर रोजी कडापे येथे बापूजी बुवा कालिकाई माता संस्था सभागृहात भव्य ‘एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली असून, या सभेला १० ते १२ हजार नागरिक उपस्थित राहण्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
माणगाव येथे १४ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी बल्क ड्रग पार्क विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर (बाबूशेठ) खानविलकर, भुवन सरपंच दिपकशेठ जाधव, सभापती विलास शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, रोहा पंचायत समिती सदस्य जगन्नाथ धनावडे, मिलिंद खानविलकर कोअर कमिटी सदस्य संजोग मानकर, निजामपूर माजी सरपंच राजाराम रणपिसे, सुधीर पवार, संजय कदम, रमेश कोळी, लहू लुष्टे यांच्यासह बाधित गावातील भूमिपुत्र आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील २१ गावांमधील सुमारे २,५०० एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (MIDC) संपादित करण्यात आली. जमीन संपादनाच्या वेळी या परिसरात इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल तसेच तुलनेने प्रदूषणमुक्त उद्योग उभारले जातील, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि परिसराचा औद्योगिक विकास होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांसमोर मांडण्यात आली होती.
या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी शासनाला दिल्या. मात्र, आता संपादित जमिनीवर भाले-पहूर परिसरात ‘बल्क ड्रग पार्क’ उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. रासायनिक उद्योगांमुळे पर्यावरण, शेती, पाणी आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.जमीन संपादनाच्या वेळी देण्यात आलेली आश्वासने आणि सध्याच्या औद्योगिक प्रकल्पाच्या प्रस्तावामध्ये मोठा फरक असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. ‘रासायनिक कंपन्या येणार नाहीत’, अशी भूमिका किंवा आश्वासन देण्यात आले असताना आता बल्क ड्रग पार्कचा प्रस्ताव पुढे आणला जात असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल झाल्याचे बल्क ड्रग पार्क विरोधी संघर्ष समिती आणि स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे केवळ जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांचाच प्रश्न निर्माण होत नसून, आसपासच्या गावांमधील नागरिक, शेती, पाण्याचे स्रोत आणि पर्यावरण यांच्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता एका गावापुरता किंवा काही शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्याच्या भवितव्याचा प्रश्न बनला असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना बल्क ड्रग पार्क विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर (बाबूशेठ) खानविलकर यांनी आक्रमक भूमिका मांडत जनतेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. जनतेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार असेल तर सत्ता किंवा पदाला कोणतेही महत्त्व नसून, जनतेच्या हितासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘बल्क ड्रग पार्क’ हा तालुक्यावर लादला जाणारा विषारी आणि घातक प्रकल्प असल्याचा आरोप करत, कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बल्क ड्रग पार्कविरोधातील पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी निजामपूर विभागातील काळकाई बापूजी बुवा कालिकाई माता मंदिर संस्था सभागृह कडापे येथे विराट ‘एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेला माणगाव तालुक्यातील बाधित २१ गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील जाणकार उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या सभेला सुमारे १० ते १२ हजार नागरिक उपस्थित राहतील, असा आयोजकांचा दावा आहे. सभेच्या माध्यमातून शासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींसमोर नागरिकांच्या मागण्या आणि आक्षेप मांडण्यात येणार आहेत. प्रकल्पाबाबत शासनाने स्थानिक नागरिकांना स्पष्ट भूमिका सांगावी आणि त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणीही करण्यात येणार आहे. विराट सभेनंतरही शासन आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या भावना गांभीर्याने घेतल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. २१ गावांतील नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.
प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, तसेच कामाची चाके रोखण्यासाठी जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजी कडापे येथे होणाऱ्या एल्गार सभेकडे संपूर्ण माणगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बल्क ड्रग पार्कच्या प्रस्तावामुळे माणगाव तालुक्यात शेतजमीन, पर्यावरण, पाणी, आरोग्य, स्थानिक रोजगार आणि औद्योगिक विकास या सर्वच मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा येऊ नये, तसेच जमीन संपादनाच्या वेळी दिलेल्या आश्वासनांचा विचार करण्यात यावा, अशी भूमिका विरोधकांकडून मांडली जात आहे. आता १६ सप्टेंबरच्या एल्गार सभेत नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, शासनाकडे कोणत्या मागण्या केल्या जातात आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा काय असेल याकडे माणगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.













































