पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : ता २६ – माणगाव तालुक्यातील दहिवली येथे कोकणी तानाबाना महिला उद्योग समूहाच्या वतीने २४ डिसेंबर २०२५ रोजी बीज निधी आढावा बैठक यशस्वीपणे पार पडली. या बैठकीत POSCO कंपनीकडून देण्यात आलेल्या ३,५०० मीटर कापडाच्या स्वरूपातील दानाचा बीज निधी म्हणून झालेला उपयोग, तसेच भविष्यातील योजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पोस्को कंपनीचे अधिकारी कुलदीप पुरंदरे, स्वप्नील पाटील, आसावरी , अश्विनी समेळ, कोकणी तानाबाना च्या अमिता मिशी आदी मान्यवर उपस्थितीत होते.
ग्रामीण भागातील १५ महिलांनी एकत्र येत पावसाळ्यासारख्या कठीण परिस्थितीतही मागील १० महिन्यांत १६,००० कापडी पिशव्या शिवून पूर्ण केल्या. या उपक्रमातून महिला समूहाने एकत्रितपणे सुमारे १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून ग्रामीण महिला उद्योजकतेचे प्रभावी उदाहरण सादर केले आहे.या शिवणकाम केंद्रासाठी टी. एन. भोस्तेकर विद्यालयाने आवश्यक जागा उपलब्ध करून दिली. तसेच श्रृंखला, सेवा सहयोग (मुंबई), सेवावर्धिनी, शुभारंभ सुपर मार्केट आणि रायगड उद्योग परिषद यांनी उत्पादनांच्या प्रचार व विक्रीसाठी स्थानिक तसेच पुणे व मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
या उपक्रमात सेवा इंटरनॅशनलने Oracle सामाजिक निधीच्या माध्यमातून महिलांना संधी दिली, तर POSCO कंपनीने या उपक्रमाची स्थिरता मजबूत करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. ऑराग्यान फाउंडेशन या महिला उद्योग समूहाशी सातत्याने समन्वय साधत असून, नव्या उत्पादनांच्या शक्यता आणि इतर गावांतील महिलांसाठीही असेच प्रेरणादायी उपक्रम उभारण्यावर भर देत आहे.येत्या काळात ऑराग्यान फाउंडेशनकडून रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भादाव येथे सामाजिक विकास केंद्र उभारण्यात येणार असून, त्याद्वारे अधिक महिला, युवक आणि विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या झालेल्या बैठकीत POSCO च्या अधिकाऱ्यांनी बीज निधीच्या प्रगतीचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेतला. कोकणी तानाबाना महिला उद्योग समूहासोबत सहकार्य करताना अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.




































