पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. ३- ह.भ.प. पुंडलिक (नाना) जगदाळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त ह.भ.प. कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली पाटील महाराज (दहिवली) यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन संपन्न झाले. सुमारे २०० ते २५० वारकरी व भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घेतला. नानांची अध्यात्मिक परंपरा लक्षात घेता वडशिवणे व परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कीर्तनामध्ये ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पाटील महाराज यांनी अध्यात्मिक समाधान प्राप्त करण्यासाठी मन एकाग्र ठेवणे, अखंड नामस्मरणाचे महत्त्व आणि संतांच्या विचारांचे आचरण यावर अत्यंत प्रभावी निरूपण केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. दहिवली तसेच वडशिवणे परिसरातील भजनी मंडळांनी भजनसेवेतून कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
ह.भ.प. पुंडलिक (नाना) जगदाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षण, पर्यावरण आणि समाजसेवेचा संदेश देणारा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. नानांच्या चिरंजीवांनी आपल्या वडिलांचा शैक्षणिक व सामाजिक वारसा जपत अजितदादा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे रु. २००१, १५०१ व १००१ अशी रोख पारितोषिके प्रदान केली. याशिवाय शाल, श्रीफळ, सुपारीचे रोप आणि प्लास्टिकमुक्त समाजाचा संदेश देण्यासाठी कापडी पिशवी भेट देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
याच कार्यक्रमात गावातील शिक्षण क्षेत्रात विशेष यश संपादन केलेल्या गुणवंतांचा “प्रेरणादीप सन्मान पुरस्कार – २०२६” देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये गावाचे पोलीस पाटील श्री हनुमंत देवकर आणि सरस्वती भागवत यांनी एलएल.बी. , तसेच वैष्णवी पन्हाळकर, जान्हवी व्हरे आणि जान्हवी सरडे यांनी बी. फार्मसी, श्रुती जगदाळे यांनी एम. फार्मसी, श्रवण जगदाळे यांनी बीसीए पदवी पूर्ण केल्याबद्दल तसेच इतर गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. या सर्व गुणवंतांचा सन्मान ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पाटील महाराज, ह.भ.प. पुंडलिक (नाना) जगदाळे यांच्या धर्मपत्नी, त्यांचे चिरंजीव तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सुपारीचे रोप आणि “प्रेरणादीप सन्मान पुरस्कार – २०२६” प्रदान करून करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी संजय मामा माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक-सचिव श्री रोहन टोणपे सर, जिजाऊ इन्स्टिट्यूट, कालठाणचे आधारस्तंभ श्री भास्कर गटकुळ सर, अजितदादा माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष श्री गोरख पारखे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच वडशिवणे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कोरे सर आणि श्री जयप्रकाश जाधव सर यांनी अतिशय सुंदर, ओघवत्या व प्रभावी शैलीत केले.
पावसाळ्याचे दिवस असूनही कार्यक्रमाच्या वेळेत निसर्गानेही साथ दिली. कार्यक्रम सुरू असताना आभाळ स्वच्छ राहिले आणि संपूर्ण धार्मिक व सत्कार सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. अध्यात्म, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समाजाप्रती कृतज्ञतेची भावना यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा पुण्यस्मरण सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.











































