पोलीस प्रवाह न्युज
माणगांव, दि.१२ – तालुक्यात भिरा येथे देवकुंड धबधबा आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेक पर्यटक धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. धबधबा मनमोहक असला तरी तेथे जाण्यासाठी ७ किमी चालत जावे लागते. एक नाला ओलांडून जावा लागतो. अचानक पाणी वाढून तसेच बुडून अनेक जण दगवल्याच्या घटना ही येथे घडल्या आहेत. अशीच एक घटना रविवार दि. १२ जुलै रोजी घडली असून देवकुंड धबधब्याजवळ दोन तरुणा पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, पाटणुस मार्गे एक २१ जणांचा ग्रुप देवकुंड धबधब्याजवळ आला होता. दि. १२ जुलै रोजी ४ वाजताच्या सुमारास ग्रुपमधील दोन तरुण पाण्यात बुडाले. विष्णू ढोक, रा. हिंगोली, वय अंदाजे २२, गोपाल राठोड, रा. नांदेड, वय अंदाजे २३ अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दरवर्षी येथे पर्यटकांचा बुडून मृत्यू होत असून दरवर्षी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने माणगाव प्रांताधीकारी देवकुंड आवारात १६३ कलम लागू करतात. मात्र दरवर्षी पर्यटक येथे येतात. शेलार मामा रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली शोधण्याचे काम सुरू होते, अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत.












































