पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १- मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली आणि निकृष्ट दर्जाची कामे हा नेहमीच प्रवाशांच्या संतापाचा विषय ठरला आहे. आता यात आणखी एका धक्कादायक प्रकरणाची भर पडली आहे. माणगाव येथील काळ नदीवर नव्याने बांधण्यात पुलाचा मातीचा भराव अवघ्या १५ दिवसांतच खचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पूल वाहतुकीसाठी खुला होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच आठव्या दिवशी रस्त्यावर मोठा खड्डा पडला आणि पंधराव्या दिवशी संपूर्ण भरावच खचला.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या या दुरवस्थेमुळे कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या महामार्गाच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भेगांमुळे अपघाताची टांगती तलवार काळ नदीवरील या नवीन पुलाच्या करण्यात आलेला भराव खचल्याने अत्यंत मोठ्या आणि धोकादायक भेगा पडल्या आहेत. डांबरी रस्त्याचा काही भाग खचल्याने या ठिकाणी वाहने घसरण्याचा किंवा थेट अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यास हा भराव अधिक खचून पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होण्याची किंवा मोठी दुर्घटना घडण्याची भीती वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
“कोट्यवधींचा निधी गेला कुठे?” नागरिकांचा संतप्त सवाल
या महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची, विशेषतः कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि जड वाहनांची मोठी वाहतूक सुरू असते. एवढ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम एवढ्या निकृष्ट दर्जाचे कसे होऊ शकते? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनचालक करत आहेत. ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, जनतेचा पैसा पाण्यात गेल्याचा आरोप होत आहे.
पावसाळा नुकताच सुरू झाला असूनb पहिल्या काही पावसातच जर पुलाची ही अवस्था झाली असेल, तर पुढील तीन महिने हा पूल टिकणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही परिस्थिती अपघातांना आमंत्रण देणारी आहे. स्थानिक प्रशासन व आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या घटनेची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत मागणी केली आहे की, संबंधित ठेकेदाराच्या कामाची उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी व्हावी. दोषी अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. युद्धपातळीवर या पुलाच्या भरावाची आणि रस्त्याची दुरुस्ती करावी. जर प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे. आता संबंधित यंत्रणा यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी असलेला काळ नदीवरील जुना पूल ब्रिटिश काळात सन १८७१ मध्ये बांधण्यात आला होता. तब्बल दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटूनही तो पूल आजही भक्कम असल्याचे नागरिक सांगतात. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या नव्या पुलाची एवढ्या कमी कालावधीत झालेली अवस्था अनेक प्रश्न निर्माण करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.











































