पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २५- सरकारी कर्मचाऱ्याच्या कर्तव्य बजावण्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी माणगाव न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. गोरगाव पोलीस ठाण्यात सन २०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा निकाल दि. २५ नोव्हेंबर रोजी माणगाव न्यायालयाने दिला.
थोडक्यात हकीकत अशी की, गोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७७/२०१७ नुसार भारतीय दंड विधान कलम ३५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी हे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. सरकारी कामकाज सुरू असताना आरोपीकडून अडथळा निर्माण करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास गोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपास अधिकारी बी. आर. जाधव यांनी केला होता. तपासानंतर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. माणगाव येथील न्यायालयात सत्र केस क्रमांक ३४/२०२३ अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता अॅड. रुपेश महाकाळ यांनी सरकारी पक्षाची बाजू न्यायालयात मांडली. या खटल्यात पैरवी अधिकारी संतोष माने, म. पो. ह. दिपाली मोरे यांनी मदत केली.
न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि प्रकरणातील नोंदींचा विचार करून आरोपी अब्दुल लतीफ उमर पालेकर (वय ६५, रा. वडवली, ता. माणगाव) याला भारतीय दंड विधान कलम ३५३ अंतर्गत दोषी ठरवले. माणगाव येथील न्यायाधीश एम. के. पाटील यांच्या न्यायालयात निकाल सुनावण्यात आला.












































