मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार – प्रमोद वाघमारे
पोलीस प्रवाह न्यूज
मुंबई : दि.०९ – सन २००१ पूर्वी पासून पोलीस खात्यात किंवा शासकीय / निमशासकीय / तसेच महानगरपालिका मधे नोकरीत लागलेल्या मयत अधिकारी / कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी सामावून घेण्यासाठी २८ मार्च २००१ च्या शासन निर्णय मधील ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसऱ्या ०३ अपत्याची अट शिथिल करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 06 जुलै 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे मुसळधार पावसात भव्य आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनामध्ये भर पावसात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ०३ रे अपत्य असणारे कुटुंबातील व्यक्ती मोठ्या प्रमाणावर हजर होते तसेच या आंदोलनामध्ये महिलांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली ! महाराष्ट्र सरकारतर्फे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलनाला भेट दिली व पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी समजून घेऊन या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पोलीस बॉईज असोसिएशनचे शिष्टमंडळ घेऊन बैठक लावली जाईल असे आश्वासन गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
या आंदोलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या आमदार डॉ.मनिषा कायंदे यांनी देखील भेट दिली होती. ही मागणी लवकरात लवकर मान्य झाली नाही तर , संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा सरकारला इशारा संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी दिला आहे.













































