पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि १९ – रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होत आहेत. सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या अडीच महिन्यापूर्वी शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माणगाव तालुका उपाध्यक्ष विजय उर्फ राजू मोरे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांसह मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ऐन जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणूक रणधुमाळीत मोठा धक्का बसला आहे.
रमेश मोरे व राजू मोरे आणि समर्थकांचा पक्ष प्रवेश सोहळा व माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करणे कार्यक्रम सोमवार दि.१९ जानेवारी २०२६ रोजी कुणबी भवन हॉल माणगाव या ठिकाणी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले म्हणाले कि, येत्या ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असून या निवडणुकी दरम्यान रमेश मोरे हे पुन्हा एकदा शिवसेना पक्षात स्वगृही आले असून राष्ट्रवादीचे राजू मोरे हे दोघे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात आले आहेत. या सर्वांचे मी शिवसेना पक्षात जाहीर स्वागत करतो. या निवडणुकांत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करा. ज्ञानदेव पवार हे इंदापूर गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते तर सुजित शिंदे यांना मोर्बा गटातून आपण जिल्हा परिषदेचा शब्द दिला होता. परंतु या दोघांनी पक्ष हितासाठी माघार घेतली त्याबद्दल या दोघांचे मी मनापासून अभिनंदन करतो. जसे आपण सर्वानी मला चारवेळा विधान सभेवर निवडून दिले तसे येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकांत शिवसेनेच्या उमेदवारांना दणदणीत मतांनी विजयी करा असे आव्हान त्यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना तालुका प्रमुख अँड. महेंद्र माणकर यांनी येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा असे सांगितले. प्रवेशकर्ते रमेश मोरे यांनी सांगितले कि, सर्वप्रथम मी मंत्री भरतशेठ गोगावले यांचे मनापासून ऋण व आभार व्यक्त करतो कि, त्यांनी मला पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश दिला. मी पुन्हा स्वगृही शिवसेना पक्षात आलो असून भरतशेठ गोगावले यांनी मला मोर्बा जिल्हापरिषद गटातून उमेदवारी जाहीर केल्याने मी त्यांचे व शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो. यापुढे मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करेन असे सांगत जिल्हा परिषद निवडणुकीत मला पुन्हा एकदा निवडून देऊन आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असे सांगितले.
या पक्ष प्रवेश सोहळ्यास तालुका प्रमुख अँड.महेंद्र माणकर, शिवसेना नेते अनिल नवगणे, सुधीर पवार, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे, म्हसळा सभापती राखी करंबे, माजी सभापती रामभाऊ म्हसकर, सुजित शिंदे, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, विभाग प्रमुख शरीफ हार्गे, मनोज सावंत, मंगेश सावंत, दाउद मापकर, राकेश पवार, फैमिद जामदार, संतोष पोळेकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




































