पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १०- माणगाव शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत कार्तिक हॉटेलसमोरील एका इमारतीमध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या धंद्यावर माणगाव पोलिसांनी गुरुवारी दि. १० सप्टेंबर पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ३२ जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ऑडीकार, दोन अर्टिगा कार, दोन दुचाकी आणि चार स्कुटी तसेच २९ मोबाईल फोन असा एकूण सुमारे ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील कार्तिक हॉटेलसमोरील नारायण शेठ यांच्या मालकीच्या बिल्डिंगमध्ये जुगाराचा धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे माणगाव पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत पहाटे सुमारे ३.३० वाजतासंबंधित ठिकाणी छापा टाकला. समोरून रूमला कुलूप लावण्यात आलं होतं. पोलिस मागून अचानक आल्याने जुगार खेळणाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ३२ व्यक्तींना ताब्यात घेतले. यामध्ये मुख्य आरोपी हितेन छेडा असून घटनास्थळावरून विविध प्रकारची ९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये एक ऑडी, दोन आर्टिगा, दोन मोटारसायकली आणि चार स्कुटीचा समावेश आहे. तसेच जुगारासाठी वापरले जात असल्याचे आढळून आलेले २९ मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांसह इतर मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ७५८२०२५ रुपये असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. माणगाव शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत.
माणगाव शहर व परिसरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईची तीव्रता कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












































