पोलीस प्रवाह न्युज
धाराशिव, दि. ३०-पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना गंभीर आजार झाल्यास राज्य शासनातर्फे त्यांना मोफत उपचार मिळत नाहीत.त्यामुळे यांना शासनाकडून मोफत उपचार देण्यात यावे या मागणीसाठी ” पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे हे गेली १० वर्षांपासून राज्य सरकारकडे सतत मागणी करत आहेत. मोर्चे काढत आहेत तरी अद्यापही राज्य सरकारने या बाबत कोणताही निर्णय घेतला नाही.
प्रमोद वाघमारे यांनी दिनांक ०९/१२/२०२५ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात या मागणीसाठी विधानभवनावर भव्य मोर्चा काढून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन दिले होते. त्यानंतर प्रमोद वाघमारे यांना १५ जुलै २०२६ रोजी ” पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांचे मार्फत पत्रव्यवहार करून कळविण्यात आले होते की , शासन निर्णय ,गृह विभाग , क्र.PWF – १२०४ / १४३ / प्र.क्र.- २ / भाग – ३ / पोल – ३ / पोल – ७ दिनांक २८/०७/२००७ अन्वये, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी / कर्मचारी तसेच त्यांच्यावर अवलंबित कुटुंबातील व्यक्तींकरिता ” पोलीस कुटुंब आरोग्य योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु, सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक – ५ मध्ये राज्य पोलीस दलातील सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा मृत्यू / बडतर्फी / सेवेतून मुक्त झालेले पोलीस अधिकारी / कर्मचारी यांची नावे यादीतून कमी करण्यात यावी असे नमूद असल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर त्यांना पोलीस कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ देता येणार नाही !
त्यामुळे या निर्णयाला विरोध करत प्रमोद वाघमारे यांनी म्हटले आहे की, पोलीस खात्यात भरती झाल्यापासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे आपल्या जीवाची पर्वा न करता / स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता जनतेच्या रक्षणासाठी २४ तास रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य पार पडतात आणि जेव्हा ते पेन्शन वरती सेवानिवृत्त होतात व त्यांना वेगवेगळे गंभीर आजार होतात तेंव्हा खरी उपचाराची त्यांना गरज असते.
परंतु, राज्य सरकार त्यांना उपचार देत नाही आणि म्हणून ही मागणी जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत ” पोलीस बॉईज असोसिएशन ” संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करून पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि २००६ चा शासन निर्णय बदलण्यास सरकारला भाग पाडू अशीही घोषणा प्रमोद तानाजी वाघमारे यांनी केली आहे.












































