पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २१- कोशिंबळे तर्फे तळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. २० जून रोजी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे तसेच छत्र्या, दप्तर, टिफिन व इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्ष तथा सदस्य विजय सहदेव बक्कम यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाला असून देणगीदात्यांच्या सहकार्याने शाळेच्या गरजेनुसार साहित्य पुरवले गेले.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक अशी दप्तर, छत्र्या, व टिफिन बॉक्स यांचे वितरण करण्यात आले. जे त्यांच्या दैनंदिन शैक्षणिक गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. या उपक्रमाला गावाच्या मान्यवरांनी तसेच पोलीस अधिकारी पुष्पा प्रकाश बक्कम आणि पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका भारती कडाळी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन आदरपूर्वक कार्यक्रमाची सुरुवात केली. उपशिक्षिका वर्षा भुसे यांनी देणगीदार महेश उभारे यांचे मनापासून आभार मानले व विद्यार्थ्यांसाठी यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम चालू राहतील अशी आशा व्यक्त केली.
या साहित्य वाटप कार्यक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला मोठा चालना मिळणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून यांसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होते. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगितले की, अशा सेवा पुढील काळातही सुरू ठेवण्यात येतील आणि शाळेतील सर्व मुलांना वेळोवेळी आवश्यक त्या सामग्रीची पूर्तता करण्यात येईल. यामुळे शिक्षणाच्या दर्जात वृद्धी होण्यास मदत होईल आणि परिसरातील पालकांचेही समाधान होईल.




































