पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २१- माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळ संचलित कुणबी भवनाच्या सामाजिक वास्तूच्या पुनर्विकासासाठी ऑईल इंडिया कंपनीच्या माध्यमातून १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून कुणबी भवनाचा सर्वांगीण पुनर्विकास करून देखणी, भव्य आणि अत्याधुनिक वास्तू उभी करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी केली. मुंबई-गोवा महामार्गालगत उभी राहणारी ही वास्तू भविष्यात समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळ संचलित कुणबी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी खासदार सुनील तटकरे बोलत होते.
यावेळी खा. सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, तालुकाध्यक्ष बाळाराम नवगणे, कुणबी समाज अध्यक्ष महादेव बक्कम, युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी, जिल्हा परिषद सदस्य अस्लम राऊत, उपसभापती मनिषा मालोरे, पंचायत समिती सदस्य संगिता बक्कम, तळा नगराध्यक्ष चंद्रकात रोडे, शैलेश भोनकर, रत्नाकर उभारे, तालुका सरचिटणीस राजेंद्र शिर्के, उपनगराध्यक्ष रिया उभारे, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुणबी भवन केवळ कार्यक्रमांचे ठिकाण न राहता विकासाचे केंद्र व्हावे. कुणबी भवनाच्या उभारणीमागे समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असल्याचे नमूद करताना खा. तटकरे यांनी बाबूराव भोनकर, मारुतीराव बुटे, प्रभाकर उभारे, अशोक दादा साबळे आणि तत्कालीन समाजबांधवांच्या योगदानाचा गौरव केला.
पुनर्विकासानंतर ही वास्तू केवळ विवाहसोहळे, सामाजिक कार्यक्रम किंवा सभा घेण्यासाठी वापरली जाऊ नये, तर नव्या पिढीच्या भवितव्यासाठी तिचा व्यापक उपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. युवकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कुणबी भवन महत्त्वाचे केंद्र बनू शकते, असे त्यांनी सांगितले.
माणगाव शहराचा विस्तार वेगाने होत असून वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील पायाभूत सुविधांचा विस्तार होणे आवश्यक आहे. यासाठी रस्ते, वाहतूक व्यवस्था, रेल्वे आणि इतर नागरी सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. माणगाव शहराभोवतीचे बायपास रस्ते, इंदापूर-माणगाव जोडरस्ते तसेच दक्षिण रायगडमधील विविध महत्त्वाच्या मार्गांच्या विकासाचा त्यांनी उल्लेख केला. या विकासकामांमुळे माणगावच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोहा रेल्वे स्थानकाच्या विमानतळाच्या धर्तीवर प्रस्तावित आधुनिकीकरणासाठी ५५ कोटी रुपयांच्या कामाचा उल्लेख केला. माणगाव, रोहा आणि दक्षिण रायगडमधील दळणवळण अधिक सक्षम झाल्यास या संपूर्ण परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे आणि विविध जोडरस्त्यांमुळे माणगाव भविष्यात दक्षिण रायगडमधील महत्त्वाचे वाहतूक व व्यापारी केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. त्यामुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कुणबी भवनाच्या पुनर्विकासासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. समाजाच्या पुढील पिढीसाठी शैक्षणिक, सामाजिक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने या वास्तूचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. १ कोटी ५० लाखांच्या निधीतून होणारा कुणबी भवनाचा पुनर्विकास हा केवळ एका वास्तूचा विकास नसून, माणगावातील सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीला नवी दिशा देणारा उपक्रम ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













































