पोलीस प्रवाह न्यूज
सांगवी : दि . ७ – शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने घोंगडी बैठक टप्पा क्रमांक ०६चे आयोजन प्रभाग क्रमांक ३२, जुनी सांगवी येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या बैठकीला शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेश किसनराव फलके, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सागर पाचर्णे तसेच चिंचवड विधानसभा प्रमुख बापू कातळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभाग क्रमांक ३२ मधील शिवसेना, युवासेना, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून बैठकीचे नियोजन करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, प्रभागप्रमुख, उपप्रमुख, विधानसभा प्रमुख यांच्यासह तळागाळातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनीही बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बैठकीदरम्यान संघटना विस्तार, शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, युवक व नागरिकांना पक्षाशी जोडणे तसेच पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक बळ देणे या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देणे, जनसामान्यांपर्यंत शिवसेनेचे कार्य पोहोचविणे आणि संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन महानगरप्रमुख राजेश फलके यांनी केले. तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करूया या निर्धाराने घोंगडी बैठक उत्साहात संपन्न झाली.













































