दारू व रसायनांसह सुमारे ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त; अवैध धंदेवाल्यांना दणका
पोलीस प्रवाह न्युज
श्रीवर्धन, दि. १८-श्रीवर्धन तालुक्यात अवैध गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात श्रीवर्धन पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५५ हजार ५०० रुपये किमतीची गावठी दारू, दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी चार ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गालसुरे काठी आणि निगडी काठी परिसरात गावठी दारू तयार करून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली. यामध्ये १०,१५० रुपये किमतीच्या ५८ बाटल्या, २०० लिटरहून अधिक गावठी दारू तयार करण्यासाठीचे रसायन आणि तयार दारूचा साठा जप्त करण्यात आला. अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, अशा धंद्यांना कायमचा आळा बसणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.












































