पोलीस प्रवाह न्युज
पुणे, दि. १६- सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे राज्याध्यक्ष संपतराव जाधव यांनी दिली. पोलिसांबाबत करण्यात आलेल्या कथित वादग्रस्त विधानाचा निषेध तसेच सेवानिवृत्त पोलिसांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
राज्याध्यक्ष संपतराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, जालना, जळगाव, नाशिक, रायगड, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, लोहमार्ग पुणे, कारागृह पुणे, ठाणे आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आल्याचे संस्थेने सांगितले.
रोहित पवार यांच्या विधानाचा निषेध
आमदार रोहितदादा पवार यांनी पोलिसांबाबत केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचा संस्थेने निषेध केला आहे. या विधानाबाबत ४८ तासांच्या आत माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. माफी न मागितल्यास येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान २० ते २५ हजार पोलिसांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही राज्याध्यक्ष संपतराव जाधव यांनी दिला आहे.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना संस्थेचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब आंधळकर, रवींद्र कामठे, शरद राव भोंगाळे, अशोकराव गुंजाळ, सुबराव लाड, सदाशिव भगत, प्रकाश लांधे, बारणे गटाचे श्री जगताप साहेब, कैलास गिरी, कैलास लांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
सेवानिवृत्त पोलिसांच्या प्रमुख मागण्या
संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एस-७ ते एस-१६ वेतनस्तर व जोखीम भत्ता लागू करणे, १२ ते १६ तासांची ड्युटी कमी करून आठ तासांची ड्युटी आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय न्यायालयीन निर्णय, विधी व न्याय विभागाचे परिपत्रक आणि संबंधित आदेशांची अंमलबजावणी करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीदेखील संस्थेने केली आहे.
हिवाळी अधिवेशनात भव्य मोर्चाचा इशारा
सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संस्थेने केली आहे. मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास हिवाळी अधिवेशनादरम्यान मोठ्या संख्येने सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आणि समर्थकांना एकत्र करून मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.













































