पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १५- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या संकल्पनेतून माणगाव तालुक्यातील मोर्बा ग्रामपंचायत हद्दीतील एस. एस. हायस्कूल, मोर्बा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंधलेखन आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि शैक्षणिक जाणीव निर्माण करणे हा होता.
यावेळी जिजाऊ संस्थेच्या वतीने राकेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि मेहनत, जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर जीवनात यश संपादन करावे, असे प्रेरणादायी विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आसिफ सर, के. के. सर, चितळे सर, गायकवाड सर, केंद्रप्रमुख, जहूर जनाब सर (उर्दू शाळा, मोर्बा), हर्षदा बोराडे मॅडम (जिल्हा परिषद शाळा, सुर्ले), सानिया राऊत मॅडम आणि नादिया वरुणकर मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच जिजाऊ संस्थेच्या वतीने राकेश पवार, वैभव म्हसणे आणि स्लाउद्दीन राऊत यांनी पुढाकार घेऊन हा शैक्षणिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी प्रेरणा मिळते.













































