पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २८- दक्षिण रायगड जिल्ह्यात असणाऱ्या माणगाव, महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा या सात तालुक्यांची एकत्रित दक्षिण रायगड जिल्हा भजन सांप्रदाय संघटनेची स्थापना करण्यात आली असून माणगाव तालुक्याची सहविचार बैठक दि २८ सप्टेंबर रोजी कुणबी भवन येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष उदय शिंदे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अजित देशमुख, सचिव प्रदीप चेरफळे, माणगाव तालुकाध्यक्ष तुकाराम लकेश्री, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष दत्ताराम सुर्वे, रोहा अध्यक्ष राजू दळवी, तळा अध्यक्ष राजेश सोलम, खजिनदार राकेश मेस्त्री, गुरुनाथ सुतार, महेश लहाने, दहिवली पोलीस पाटील तुकाराम चेरफळे, सतीश कळंबे, हरदास शिंदे, अरुण शिंदे, अल्केश शिंदे संघटना कार्यकारणी आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की, दक्षिण रायगड जिल्ह्यात अनेक भजनी मंडळ आहेत. परंतु, भजन कलावतांना विविध शासकीय योजना, विमा सुरक्षा, पेन्शन योजना इत्यादींचा लाभ मिळत नाही. प्रत्येक कलावंताला व भजन मंडळाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यामुळे भजन मंडळ नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. भजनी कलाकारांच्या व मंडळाच्या अडचणी सरकार दरबारी पोचविणे गरजेचे आहे. माणगाव तालुक्यात सर्व भजनी मंडळांना नोंदणीकृत करण्यासाठी यावेळी आवाहन करण्यात आले. सर्वांनी या भजन सांप्रदाय संघटनेत सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.


































