पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. ६- रायगड जिल्ह्याचं राजकारण सध्या एका अशा टप्प्यावर पोहोचलंय, जिथे संवादाच्या जागी वाद, आणि वैचारिकतेच्या जागी वैरभाव आला आहे. महायुती सरकारमध्ये एकत्र सत्तेत असलेले दोन घटक पक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे जिल्ह्याच्या मातीत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्याचे पडसाद आता उघड सभा-वक्तव्यातून नव्हे, तर जनतेच्या मनातही उमटू लागले आहेत.
सुरुवात झाली ती एका साध्या पत्रकार परिषदेतून. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित करत थेट खासदार सुनील तटकरे यांच्यावर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, वर्षानुवर्षं प्रवाशांचे हाल चालू आहेत. अपघात होत आहेत. जनतेचा संयम सुटतोय. पण खासदार म्हणून जबाबदारी घेणं दूरच, उलट विविध बहाण्यांमधून ती टाळली जात आहे.
आधीच भर सभेत खा. तटकरे यांनी ना. भरत गोगावले यांची ‘नॅपकिन’संदर्भात केलेली मिमिक्री हा वाद चांगलाच विकोपाला गेला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मते, ही मिमिक्री फक्त टीका नव्हती, तर जाणूनबुजून केलेली सार्वजनिक अवमानना होती.
या पत्रकार परिषदेत अरुण चाळके यांचा संताप उफाळून आला आणि त्यांनी तटकरे यांना ‘गद्दार’ असा शब्द वापरून थेट वैयक्तिक हल्ला चढवला. या एकाच शब्दाने रायगडमधील राजकारणात वणवा पेटला. सोशल मीडियावर हाच विषय ट्रेंड करू लागला. कार्यकर्ते, समर्थक, विरोधक सर्वच बाजूंनी प्रतिक्रिया येऊ लागल्या.
पण राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही कमी प्रत्युत्तर दिलं नाही. माणगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सुभाष केकाणे यांनी वक्तव्य केलं की, “बारा गावचं पाणी पिऊन आलेल्या मंडळींना आता वेळ आली आहे खरी जागा दाखवण्याची. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतपेटीतूनच उत्तर दिलं जाईल. त्यांच्या ह्या विधानानं एक नवा अर्थ घेतला. पक्षीय संघर्ष आता खुल्या रणांगणात उतरला होता.
या सर्व वादात, कुणी गद्दार, कुणी महागद्दार हे ठरवण्याचं काम मतदारांवर सोडलं गेलं आहे. सध्या दोन्ही पक्ष आपापल्या भाषणांतून आणि सभा-प्रचारांतून परस्परांवर कुरघोडी करत आहेत. एकमेकांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करणं, जुन्या घटनांची आठवण करून देणं आणि नव्या योजनांच्या श्रेयासाठी जणू स्पर्धाच लागली आहे.
या झगड्याच्या केंद्रस्थानी आहेत मतं. कारण जवळच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आहेत. आणि प्रत्येक नेत्याला हे ठाऊक आहे की, जो आज आवाज उठवतोय, तोच उद्याच्या मतदाराच्या मनात ठसतो. म्हणूनच शब्दांची धार अधिक तीव्र झाली आहे. वक्तव्यं अधिक आक्रमक झाली आहेत आणि पक्षांची शिस्त निसटलेली जाणवते आहे.
पण या सगळ्या राजकीय नाट्यामध्ये जनतेचा प्रश्न हरवत चाललाय. महामार्गाचं रखडलेलं काम, आरोग्याच्या सोयींचा अभाव, शिक्षणाच्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सगळं आता फक्त भाषणातल्या ओळी झालंय आणि त्या ओळींमागे वास्तव दडून बसलंय.




































