पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १- माणगाव एम एम आर एफ सी वर्षभरात अनेक विविध दिनानिमित्त विविध सामजिक उपक्रम घेत असते. वैद्यकीय प्रतिनिधी म्हणजेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जागतिक (एमआर) दिनानिमित्त दि. १ ऑगस्ट रोजी माणगाव-महाड तालुक्यातील एम एम आर एफ सी फ्रेंड सर्कलच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे रुग्णांच्या सेवेसाठी प्राथमिक उपचार पद्धतीसह डॉक्टरांना दैनंदिन सेवेत लागणारी व रुग्णांना उपयोगी असणारी औषधे व ऑपरेशन थिएटर आणि अपघात विभाग या ठिकाणी सर्रास वापरण्यात येणारे सर्जिकल साहित्य भेट देण्यात आले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत एमएमआरएफसीच्या सदस्यांनी आपल्या कष्टाने कमावलेल्या उत्पन्नातून रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधे व सर्जिकल साहित्य उपलब्ध करून दिले. या सामाजिक उपक्रमाचे रुग्णालय प्रशासनाने कौतुक करत एम एम आर एफ सी च्या कार्याचे स्वागत केले.
या प्रसंगी एमएमआरएफसीचे अध्यक्ष प्रदीप शेपुंडे, सचिव दीपेश जाधव, खजिनदार सुरेश शिंदे तसेच जेष्ठ सदस्य स्वप्नील सुर्वे, समीर नाडकर, समीर शिंदे, आणि एम एम आर एफ सी कमिटीचे सर्व जेष्ठ व युवा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष प्रदीप शेपुंडे म्हणाले की, या कार्यक्रमात आमच्या संघटनेच्या प्रत्येक सदस्याचा जेष्ठ आणि युवा सदस्यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. हे कार्यक्रमाचे पहिले वर्ष आहे त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असल्यास त्या सुधारून पुढील वर्षी हाच कार्यक्रम जोमाने आणि उत्साहाने करू.
कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. रामदास तरपेवार, डॉ. मृणाली वाढवळ तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी समाजसेवक संतोष खाडे व रवि फार्माचे मालक उद्योजक रामनारायण मिश्रा यांचे विशेष सहकार्य लाभले. एम आर दिनाचे औचित्य साधून रुग्णांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजाप्रती वैद्यकीय प्रतिनिधींची संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्व अधोरेखित करणारा ठरला.













































