पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २८- रोटरी क्लब बॉम्बे सेंट्रल आरोग्य व शैक्षणिक कार्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. माणगाव तालुक्यातील आदिवासी विद्यार्थांचे जीवन प्रकाशमय करण्याचे काम रोटरी क्लबने केले आहे. निस्वार्थी सेवा देत रोटरी क्लब खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे कार्य करीत आहे. रोटरी क्लब बॉम्बे सेंट्रलच्या कार्याचे पैलू वाखाणण्याजोगे आहे. त्यातून मला प्रेरणा मिळत असून मी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्परी सहकार्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, असे प्रतिपादन रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी माणगाव येथे केले.

रोटरी क्लब बॉम्बे सेंट्रलच्या माध्यमातून माणगाव तालुक्यातील १० जिल्हा परिषद शाळांना सोलर किट व १२ शाळांना ई लर्निग किट वाटप लोकार्पण सोहोळा दि. २७ जून रोजी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव तहसील कार्यालय येथील सभागृहात पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक रायगड आय. पी. एस. आंचल दलाल, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल अध्यक्षा सुरंगी मेहता, संचालक चंद्रेश अंबानी, प्रोजेक्ट चेअरमन दत्ताराम शिंदे, प्रोजेक्टर कॉर्डिनेटर मानसी शहा, रोटरियन रेखा सोळंखी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे, गट शिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. तसेच यावेळी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे नेत्र शस्त्रक्रियेसाठी लागणारी रु. १ लाख २५ हजार किमतीची सामग्री रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल तर्फे देण्यात आले. तसेच शिरवली तर्फे गोवेले येथे वृक्षारोपण करण्यात आले. गेली ४ वर्ष रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य व ४२ शाळांना आतापर्यंत ई लर्निग किट वाटप करण्यात आले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, समाजात ज्या मुली मागे राहिल्या आहेत. त्यांना पुढे आणण्याचे काम आपल्याला करायच आहे. विद्यार्थ्यांना साधनसामग्री कमी पडू नये यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. शिक्षक समाज घडवण्याच्या कार्य करत असतात. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रलच्या प्रेरणेतून मी सुद्धा माझ्या गावी असेच अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा नक्की प्रयत्न करेन असा विश्वास यावेळी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केला.

माणगाव तालुक्यातील विळे धनगरवाडा, हर्णे आदिवासीवाडी, वाकी आदिवासीवाडी, कोस्ते आदिवासीवाडी, मुठवली/निवी आदिवासीवाडी, लोणशी आदिवासीवाडी, खर्डी आदिवासीवाडी, महादपोली आदिवासीवाडी, शिरवली आदिवासीवाडी, देगाव आदिवासीवाडी या जिल्हा परिषद शाळांना सोलर किट तसेच १२ शाळांना ई लर्निग किट व २० पंखे आणि २२ लाइट्स रोटरी क्लब बॉम्बे सेंट्रलच माध्यमातून मिळाल्याने त्यांच्या सामाजिक कार्याचे शिक्षण विभागाने कौतुक केले.
यावेळी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी लोणशी आदिवासी शाळेला भेट देत सोलर किट उद्घाटन केले. तसेच वृक्षारोपण करण्यात आहे. यावेळी रोटरी प्रोजेक्ट चेअरमन दत्ताराम शिंदे यांनी प्रास्ताविक केले. तर रोटरी अध्यक्षा सुरांगी मेहता, चेअरमन चंद्रेश अंबानी, गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, शिक्षिका अर्चना शेळके, विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी संजय पालांडे, योगेश शेलार यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर शिंदे यांनी केले.

उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे शस्त्रक्रिया सामग्री देताना रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल




































