पोलीस प्रवाह न्युज
पिंपरी चिंचवड, दि. १- पाचगणी–महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथे दिनांक ३०, ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय थाईबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष पाशा आत्तार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडची कन्या शरयू संतोष म्हात्रे हिने ६५+ किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत टायटल बेल्ट पटकावला आहे.
देशभरातून आलेल्या नामांकित व बलाढ्य खेळाडूंना पराभूत करत शरयूने अंतिम लढतीत तांत्रिक कौशल्य, ताकद आणि आत्मविश्वासाचे प्रभावी दर्शन घडवले. तिच्या या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रात गौरव वाढला आहे.
शरयू ही संत तुकाराम नगर येथील शरयू बॅडमिंटन हॉलमध्ये मागील १० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पंच तथा प्रशिक्षक संतोष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण सराव करत आहे. तिच्या या यशामागे कठोर परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.
या यशाबद्दल राष्ट्रीय थाईबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष पाशा आत्तार यांनी शरयूचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिच्या खेळाचे विशेष कौतुक केले असून, भविष्यात ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या उल्लेखनीय विजयाबद्दल शरयूवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

































