पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. २० –करमाळा शहर व बसस्थानक परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांवर आळा घालत करमाळा पोलिसांनी दोन मोठ्या गुन्ह्यांची उकल केली आहे. ०६ तोळे ०७ ग्रॅम सोने चोरी करणाऱ्या महिला चोरटीसह मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्यास अटक करून पोलिसांनी एकूण १० लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. (भा.पो.से.) यांनी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना बसस्थानकावरील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कामगिरी केली.
घटना क्रमांक ०१: बसस्थानकावर १० लाखांचे सोने लंपास
फिर्यादी स्वाती धनंजय पुजारी, वय ३२ वर्षे, धंदा घरकाम, रा. अंकोली ता. मोहोळ जि. सोलापूर या दि. ३०/०४/२०२६ रोजी सायंकाळी ०५:०० वाजण्याच्या सुमारास करमाळा ते सोलापूर बसने प्रवास करण्यासाठी करमाळा बसस्थानकावर आल्या होत्या. बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी आपली पर्स चेक केली असता पर्सच्या सर्व चेन उघडलेल्या दिसल्या.आत पाहिले असता त्यांच्या हँडपर्स मधील १२५ ग्रॅम सोन्याचा राणी हार, २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठन, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोकर, ०५ ग्रॅम वजनाचे कानातील झुबे टॉप असा एकूण १०,०५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेऊन हँडपर्स हातातील घेऊन चोरी केले होते. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासात गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषण व बसस्थानकावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे हा गुन्हा महिला आरोपी साधना जैष्या काळे, वय २७, रा. बिडकीन ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर हिने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने सदरचे सर्व दागिने तिच्या घरामध्ये पेटीमध्ये ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिच्या ताब्यातून १०,०५,००० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. मोहोळकर हे करीत आहेत.
घटना क्रमांक ०२: कसाब गल्लीतून स्प्लेंडर चोरी
दि. ०४/०८/२०२६ रोजी दुपारी ०९:०० वाजण्याच्या सुमारास ओंकार सुभाष मारडकर यांची कसाब गल्ली, करमाळा येथे घराबाहेर लावलेली मोटारसायकल कोणीतरी चोरून नेली. ते दुपारी ०३:१५ वाजता बाहेर येऊन पाहिले असता गाडी जागेवर नव्हती.
चोरीस गेलेली गाडी: हिरो होंडा स्प्लेंडर, किंमत ६४,०००/-, आर.टी.ओ. क्र. MH 16 Z 9940, चेसीस नंबर 06G16F21104. याबाबत गु.र.नं. ६९८/२६, भा.न्या.सं. ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषण व सी.सी.टी.व्ही. च्या आधारे हा गुन्हा आरोपी रावसाहेब उर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण, रा. सावडी ता. करमाळा जि. सोलापूर* याने केल्याचे निष्पन्न केले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरची मोटारसायकल सावडी गावातील पुलाखाली लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी ती गाडी जप्त केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पदवीधर पो.कॉ. ईसामिया बहीरे हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, पो.हे.कॉ. अभिजीत मोहोळकर, पो.ना. वैभव टेंगल, पो.कॉ. ईसामिया बहीरे, पो.कॉ. रविराज गटकुळ, पो.कॉ. अर्जुन गोसावी, पो.कॉ. अमोल रंदिल, पो.कॉ. योगेश येवले, पो.कॉ. गणेश शिंदे यांनी ही कामगिरी केली आहे. याबद्दल फिर्यादी तसेच करमाळा तालुक्यातील नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात असून तालुक्यातील अवैद्य धंद्यांवरती ही अशाच प्रकारची कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनेकडून करण्यात येत आहे












































