पोलीस प्रवाह न्युज
रायगड, दि. २९- नजिकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम बाबत निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच कामाला लागावे, आपापसात समन्वय राखून सर्वांनी एकदिलाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दि. २९ ऑक्टोबर रोजी दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जावळे यांनी पोलीस यंत्रणांसह विविध शासकीय यंत्रणांची दूरदृश्यप्रणालीद्वारे पूर्वतयारी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ.रविंद्र शेळके, जिल्ह्यातील व नवी मुंबई परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक, प्रांताधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जावळे यांनी सूचना दिल्या की, निवडणुकीच्या आवश्यकतेप्रमाणे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या दृष्टीने सर्व विभागांनी मनुष्यबळाचा डाटाबेस तयार करावा. सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागावे. संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र मतदारांसाठी सोयीस्कर असेल, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक सर्व सोयीसुविधा व्यवस्थित असतील, अपंग मतदारांसाठीची व्यवस्था अत्यंत चोख असेल, याची वैयक्तिक खात्री करावी. सर्व मतदान केंद्र स्वतः तपासावीत. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक सर्व कार्यवाही आणि कारवाया तात्काळ कराव्यात. नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात राहावे.





































