पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ३- तालुक्यातील पहेल गावासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरलेल्या एका ऐतिहासिक यशाची नोंद झाली आहे. पहेल गावातील शेतकरी कुटुंबातील कन्या कु. दीक्षिता सुवर्णा तुकाराम मांजरे (चिटू) हिची अवघ्या १८ व्या वर्षी मुंबई पोलिस दलात निवड झाली असून, तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, दीक्षिताची मुंबई पोलिस दल आणि मुंबई कारागृह विभाग अशा दोन्ही ठिकाणी निवड झाली असून तिने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी दीक्षिताशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचे अभिनंदन केले आणि पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मंत्री महोदयांनी तिच्या जिद्दीचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी आदर्श असल्याचे सांगितले.
ग्रामीण भागातील अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दीक्षिताने लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आई-वडील शेतात राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना, दीक्षिता देखील घरातील जबाबदाऱ्या सांभाळत अभ्यास आणि सराव करत होती. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि ग्रामीण भागातील विविध आव्हाने यांना न जुमानता तिने आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. धावण्याची विशेष आवड असलेल्या दीक्षिताने शालेय जीवनात अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. गुरे चारताना, शेतात काम करताना आणि गावातील मोकळ्या मैदानावर नियमित सराव करत तिने स्वतःची शारीरिक क्षमता विकसित केली. तिच्या अथक मेहनतीचे फळ म्हणून तिने तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पारितोषिके पटकावली. याच क्रीडा कौशल्याने आणि कठोर परिश्रमाने तिला पोलिस भरतीची कठीण शर्यत यशस्वीरित्या पार करता आली.
दीक्षिताच्या निवडीची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण पहेल गाव आनंदोत्सवात न्हाऊन निघाले. गावकऱ्यांनी तिचे जंगी स्वागत करत भव्य मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि फुलांच्या वर्षावात गावकऱ्यांनी आपल्या लेकीच्या यशाचा जल्लोष साजरा केला. मुलीच्या या यशामुळे तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. त्यांच्या कष्टांचे चीज झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती.
पहेल गावातील पहिली महिला पोलीस म्हणून दीक्षिताने इतिहास घडवला आहे. तिच्या या यशामागे पहेल गावचे सुपुत्र व शिक्षक सुजित मालोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दीक्षिताचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, पहेल येथे झाले. त्यानंतर तिने जे. बी. सावंत हायस्कूल, पन्हळघर-लोणेरे येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण तिने नाम जोशी विद्या भवन, गोरेगाव येथे घेतले.
तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे. योग्य जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनत असेल तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे तिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दीक्षिताचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या यशामागे आई-वडिलांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची प्रामाणिक मेहनत असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
कु. दीक्षिता मांजरे हिचे हे यश केवळ एका कुटुंबाचे नसून संपूर्ण पहेल गाव, माणगाव तालुका आणि रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. भविष्यातही ती पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करून समाजसेवेचे व्रत जोपासेल आणि आपल्या गावाचे नाव अधिक उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.










































