पोलीस प्रवाह
माणगाव, दि. १७-अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा अखेर निर्णय झाला असून महाड-पोलादपूर-माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री ना. भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीची घोषणा होताच रायगड जिल्ह्यासह महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यात शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ना. भरतशेठ गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याची अधिकृत माहिती समोर येताच माणगाव शहरात शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी माणगाव बसस्थानकासमोर जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा सेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ज्ञानदेव पोवार, मा. उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, शहर प्रमुख प्रसाद धारिया, नितीन दसवते, रफिक परदेशी, प्रफुल खरंगटे, अजित भोनकर आधी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. गोगावले यांच्या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. विशेषतः माणगाव, महाड आणि पोलादपूरसह रायगडच्या ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामांना चालना मिळावी, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
माणगाव- महाड परिसराशी असलेले जिव्हाळ्याचे नाते
ना. भरत गोगावले हे महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघाचे आमदार असल्याने या परिसरातील स्थानिक प्रश्नांची त्यांना जवळून जाण आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना जिल्ह्यातील विविध भागांच्या विकासासाठी समन्वय साधण्यास त्यांना अधिक संधी मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. रायगड जिल्ह्याला मोठा समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक व पर्यटनस्थळे तसेच औद्योगिक आणि कृषी क्षेत्राची मोठी क्षमता लाभली आहे. या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास साधण्यासाठी पालकमंत्री म्हणून ना. गोगावले कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
माणगावात शिवसैनिकांचा उत्स्फूर्त जल्लोष
पालकमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर माणगाव बसस्थानकासमोर शिवसेना व युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. फटाक्यांची आतषबाजी करत तसेच पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी “ना. भरतशेठ गोगावले यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रिपदी ना. भरत गोगावले यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही जबाबदारी महत्त्वाची ठरणार असून, आगामी काळात जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांना ते कशा पद्धतीने प्राधान्य देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












































