पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २४- तालुक्यात भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत पंकज तांबे यांच्या पुढाकाराने माणगाव येथे नव्या कार्यालयाचे दि. २३ सप्टेंबर रोजी उद्घाटन झाल्यानंतर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर कार्यालय हे भाजपचे अधिकृत मध्यवर्ती कार्यालय नसून पंकज तांबे यांचे वैयक्तिक जनसंपर्क कार्यालय असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच या उद्घाटन कार्यक्रमावर तालुका व शहर कार्यकारिणीने बहिष्कार टाकल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष परेश सांगळे, उपाध्यक्ष सुधीर म्हामुणकर, शहराध्यक्ष राकेश जाधव, सरचिटणीस किसन महाडिक उपस्थित होते.
माणगाव येथे पंकज तांबे यांच्या पुढाकाराने नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमाबाबत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना कोणतीही अधिकृत पूर्वसूचना अथवा लेखी निमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष ,शहराध्यक्ष तसेच पक्षातील इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक रचनेला डावलून कार्यक्रम घेणे योग्य नसल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.
भाजप हा शिस्त आणि संघटनात्मक नियमांना महत्त्व देणारा पक्ष आहे. पक्षाच्या कोणत्याही अधिकृत कार्यक्रमाचे नियोजन करताना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची पक्षाची पद्धत आहे,विशेषतः पक्षाचे अधिकृत कार्यालय सुरु करायचे असल्यास तिथल्या मंडल अध्यक्ष, शहर अध्यक्ष यांच्या परवानगीने कार्यालय सुरू करणे बंधनकारक आहे.मात्र, या कार्यक्रमात आवश्यक असलेला प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याचा खुलासा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला.
पंकज तांबे हे नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले असल्याने पक्षाची संघटनात्मक कार्यपद्धती आणि नियम समजून घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला पत्रकार परिषदेत देण्यात आला.पक्षात नव्याने येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत असले तरी, त्याचवेळी जुन्या कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उद्घाटन करण्यात आलेल्या कार्यालयाबाबतही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. हे कार्यालय भाजपचे अधिकृत मध्यवर्ती कार्यालय नसून पंकज तांबे यांचे वैयक्तिक जनसंपर्क कार्यालय असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिक,भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयाला पक्षाचे अधिकृत कार्यालय समजू नये, अश्या सूचनाही पत्रकार परिषदेत करण्यात आले. पक्षाच्या नावाचा किंवा प्रतिमेचा वापर करताना अधिकृत संघटनात्मक मान्यता आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची माहिती असणे आवश्यक असल्याची भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मांडली.
भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना देणे आवश्यक आहे. पक्षवाढीचे काम काही मोजक्या व्यक्तींपुरते मर्यादित न राहता सर्वांना सोबत घेऊन केले पाहिजे.स्थानिक कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करत असताना त्यांना डावलून कार्यक्रम घेण्यात येत असतील तर त्याचा पक्ष संघटनेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर,जिल्हाध्यक्ष मा.खा.धैर्यशील पाटील, सरचिटणीस प्रशांत शिंदे,हेमा मानकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्याकडे याबाबत सविस्तर म्हणणे मांडणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. स्थानिक संघटनेला विश्वासात न घेता पक्षाच्या नावाने होणाऱ्या कार्यक्रमांबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट भूमिका घ्यावी,अशी मागणीही करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी पक्ष संघटनात्मक पातळीवर योग्य ती दखल घेणार असल्याचे सांगितले.












































