पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १२- महाराष्ट्र राज्याचे माजी तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद महादेवराव मोहितकर यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ सुधारणा अधिनियम, २०२६ अन्वये प्र-कुलगुरू हे पद नव्याने निर्माण करण्यात आले असून, या पदावर नियुक्त होणारे डॉ. मोहितकर हे विद्यापीठाचे पहिले प्र-कुलगुरू ठरले आहेत. ते १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने कुलगुरूंशी विचारविनिमय करून अधिनियमाच्या कलम १४अ अन्वये ही नियुक्ती केली आहे. डॉ. मोहितकर यांना तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय व शैक्षणिक कामाचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयात सहायक संचालक व उपसंचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव व संचालक तसेच २०२३ ते २०२६ या कालावधीत राज्याचे तंत्रशिक्षण संचालक म्हणून काम पाहिले आहे.
राज्यातील स्वायत्त अभियांत्रिकी व पदविका संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राष्ट्रीय श्रेयांक आराखड्याच्या अंमलबजावणीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. टेक्विप (TEQIP) प्रकल्पाचे राज्य समन्वयक म्हणून त्यांनी १६२.५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत योगदान दिले. तसेच आयआयटी मुंबईच्या सहकार्याने १५ संस्थांच्या मार्गदर्शनासाठी सामंजस्य करार आणि शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये थ्री-डी प्रिंटिंग, रोबोटिक्स व ऑटोमेशनची उत्कृष्टता केंद्रे उभारण्याच्या उपक्रमांत सहभाग घेतला. प्रशासकीय सुधारणा व ई-गव्हर्नन्समधील कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘सर्वोत्कृष्ट संचालक/आयुक्त’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
डॉ. मोहितकर यांनी व्हीएनआयटी, नागपूर येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. एम. एस. विद्यापीठ, बडोदा येथून त्यांनी एम.ई. पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली, तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेत पीएच.डी. प्राप्त केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार संशोधकांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या नावावर तीन पेटंट्स आणि ३९ शोधनिबंध आहेत. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, व्हीएनआयटी नागपूर, आयआयआयटी पुणे व नागपूर आणि एनआयटीटीटीआर चेन्नई यांसारख्या संस्थांच्या नियामक मंडळांवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.
सुधारित अधिनियमानुसार प्र-कुलगुरू हे कुलगुरूंनंतरचे विद्यापीठातील प्रमुख शैक्षणिक व कार्यकारी अधिकारी असतील. शैक्षणिक नियोजन, शैक्षणिक लेखापरीक्षण, गुणवत्ता हमी, उद्योग व संशोधन संस्थांशी समन्वय आणि निधी पुरविणाऱ्या संस्थांशी संपर्क या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असतील.
या नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांनी समाधान व्यक्त केले. डॉ. मोहितकर यांचा तंत्रशिक्षण प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव, परीक्षा व संलग्नता व्यवस्थेची जाण आणि उद्योगजगताशी असलेले संबंध यांचा विद्यापीठाला शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यास, वेळेत निकाल जाहीर करण्यास तसेच संशोधन व नवोपक्रमांना चालना देण्यास लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. मोहितकर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लाभलेल्या विद्यापीठाचा पहिला प्र-कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा त्यांच्यासाठी सन्मान आणि जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील आणि कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले.
शैक्षणिक वेळापत्रकाचे काटेकोर पालन, परीक्षा व निकाल वेळेत जाहीर करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, संलग्न महाविद्यालयांतील गुणवत्ता संवर्धन आणि उद्योग व संशोधन संस्थांशी भागीदारी यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार तंत्रशिक्षण आणि रोजगारक्षम कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.













































