पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ५- अहिल्यानगर येथील अरणगाव बायपास चौकात एक थरारक दरोड्याची घटना घडली आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ५० लाख रुपये आणि सोन्याची लूट करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अविनाश नलवाडे व त्यांचे सहकारी प्रकाश जंगम आणि सोन्यालाल माळी यांच्यावर पाळत ठेवून अरणगाव बायपास चौकात त्यांना गाठले. भररस्त्यात करण्यात आलेल्या या जीवघेण्या हल्ल्यानंतर दरोडेखोरांनी तब्बल ५० लाख रुपयांची रोकड आणि सुमारे १५ ते १६ तोळे सोने लुटून नेले आहे.
या अमानुष मारहाणीत तिघांनाही बेदम चोप देण्यात आला. हल्ल्याची तीव्रता एवढी भीषण होती की, यामध्ये एका जखमीचा डोळा पूर्णपणे निकामी झाला आहे. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक संशयानुसार, परिचयाच्या कामगारांनीच पूर्वनियोजित कट रचून हा दरोडा टाकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अक्षय मोहिते आणि राजू मोहिते यांच्यासह सुमारे १५ जणांच्या टोळीवर हल्ला केल्याचा आरोप अविनाश नलावडे यांनी केला आहे.
अविनाश नलवाडे हे माणगाव तालुक्यातील निजामपूर गणातून जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्याकडे पूर्वी ४-५ वर्षे काम केलेले अक्षय मोहिते आणि राजू मोहिते यांनी हा कट रचल्याचा आरोप अविनाश नलावडे यांनी केला आहे. कामाचे पेमेंट देण्याच्या बहाण्याने त्यांनी नलवाडे यांना आधी ‘सुपा’ येथे बोलावले, त्यानंतर नातेवाईक आणि बहीण असल्याचे सांगून ‘अहिल्यानगर’ येथील एक्सप्रेस हायवेच्या बाजूला असणाऱ्या त्यांच्या घरांजवळ येण्यास भाग पाडले. जेव्हा अविनाश नलवाडे पैशांची बॅग काढून पेमेंट देण्यास पुढे आले, तेव्हा आधीपासूनच तिथे दबा धरून बसलेल्या ५-६ जणांच्या टोळीने (जे आरोपींचे नातेवाईकच होते) त्यांना गाडीतून खाली उतरवले. काही समजण्याच्या आतच दरोडेखोरांनी नलवाडे यांच्या पायावर आणि डोक्यात लोखंडी रॉडने भीषण वार केले. यावेळी गाडीत सोबत असलेले त्यांचे मित्र प्रकाश जंगम आणि आणखी एका सहकाऱ्यावरही अशाच प्रकारे अमानुष हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून एका सहकाऱ्याचा डोळा निकामी झाल्याची माहिती आहे. ५० लाख रुपयांची कॅश आणि दागिने लंपास केली. हल्लेखोरांनी जखमींना बेदम मारहाण करत त्यांच्याकडील मौल्यवान ऐवज लुटला. गाडीत असणारी ५० लाख रुपयांची रोख रक्कम गळ्यातील सोन्याच्या चेन, हातातील ब्रेसलेट, अंगठ्या आणि मोबाईल. एकूण सुमारे १५ ते १६ तोळे सोन्याचे दागिने हल्लेखोरांनी लुटून नेले.
“आम्हाला बोलवून आमची दिशाभूल करण्यात आली आणि हा दरोडा टाकण्यात आला. माझी प्रशासनाला आणि एसपी, पीआय साहेबांना हीच विनंती आहे की, या चोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन आमचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे यांनी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसाने पोलिसांनी दिली आहे.










































