पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २७- माणगाव बसस्थानक परिसरात बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी करून पसार झालेल्या दोन महिला आरोपींना माणगाव पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे गंठन असा सुमारे १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
माणगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, साधना राज बागडे (वय २९ वर्षे, व्यवसाय गृहिणी) या दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास गणपती सणानिमित्त आपल्या मूळ गावी जाण्यासाठी माणगाव बसस्थानकात आल्या होत्या. त्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास केले होते. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करताना माणगाव पोलिसांनी आरोपींचा रेकॉर्ड तपासला. तसेच माणगाव तालुक्यासह कोकणगाव, भिवंडी आदी परिसरात तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी अर्चना वासू आकळू (वय ३० वर्षे, सध्या रा. माळदे, इंग्लिश स्कूलजवळ, राजनौलीगाव, कोनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे, मूळ प्रयागराज, उत्तर प्रदेश) आणि पूजा राहुल मोरे (वय २२ वर्षे, रा. विष्णुपुरी, रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, नांदेड, मूळ रा. नाईकनगर, बीड बायपास रोड, देवळाली, औरंगाबाद) या दोन महिला आरोपींना अटक केली.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याचे गंठन असा सुमारे १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आरोपींकडून माणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेले आणखी काही गुन्हे उघडकीस आणण्यात आल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ही कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि माणगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली. या कारवाईमुळे माणगाव बसस्थानक परिसरातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तपासाला यश आले आहे.












































