पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १७- रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ना. भरत गोगावले यांची निवड झाल्याची घोषणा होताच माणगाव तालुक्यातील लोणेरे नाक्यावर शिवसैनिकांनी जल्लोष करत या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रायगड जिल्ह्याला ना. भरत गोगावले यांच्या रूपाने पालकमंत्री मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
लोणेरे नाक्यावर शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी फटाके फोडून, पेढे व बर्फी वाटून आनंद साजरा करण्यात आला. “नामदार भरत गोगावले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. उत्साहाचे वातावरण पाहता लोणेरे नाक्यावर जणू दिवाळीच साजरी होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून ना. भरत गोगावले प्रभावीपणे काम करतील. तसेच जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांना गती मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या जल्लोषाच्या कार्यक्रमाला शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चालके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, समन्वयक निलेश केसरकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र टेंबे, उपविभाग प्रमुख शेखर घोसाळकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अभिजित टेंबे, अनिता महाबळे, अक्षय अंधेरे, समाधान करकरे, जितेंद्र टेंबे, महेंद्र टेंबे, मधुकर उभारे, संजय पवार, संजू जाधव, प्रकाश शिगवण यांच्यासह असंख्य शिवसैनिक, युवा सैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदी निवडीमुळे रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात जिल्ह्याच्या विकासकामांना अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.













































