बनावट फेसबुक खात्याद्वारे अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मंगेश तांबेला ठाणे न्यायालयाचा दणका
५० हजार रुपयांचा दंड पीडितांना देण्याचे आदेश
पोलीस प्रवाह न्युज
ठाणे, दि. ३० – सोशल मीडियाचा गैरवापर करून अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्यांचा विनयभंग व मानसिक छळ करणाऱ्या एका तरुणाला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आरोपी मंगेश ईश्वरदास तांबे (वय २८, रा. उत्तन) याला माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, तसेच भादंवि कलम ३५४(अ) अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडितांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सागरी उत्तन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपी मंगेश तांबे याने डिसेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत सायबर गुन्हेगारीचा डाव रचला होता. त्याने सुरुवातीला फेसबुकवर ‘विद्या’ या नावाने मुलीचे खोटे प्रोफाईल तयार करून फिर्यादी तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. समोरील व्यक्ती मुलगीच आहे असे वाटल्याने फिर्यादीने ती विनंती स्वीकारली. मात्र, चॅटिंगदरम्यान आरोपीने अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली. संशय आल्याने फिर्यादीने व्हिडिओ कॉल केला असता स्क्रीनवर मुलगी नसून पुरुष असल्याचे उघड झाले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीचा नंबर ब्लॉक केला.
बदल्याच्या भावनेतून बनावट खाते
नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून आरोपीने फिर्यादीच्याच नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडले. या खात्यावरून त्याने फिर्यादीची चुलत बहीण आणि तिच्या अल्पवयीन मैत्रिणींना अश्लील मेसेज, फोटो व व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली. मुलींना धमकावून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही प्रकरणात करण्यात आला. या त्रासाला कंटाळून फिर्यादीने सागरी उत्तन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
९ महत्त्वाचे साक्षीदार तपासले
खटल्याची सुनावणी ठाणे सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील श्रीमती भामरे पाटील यांनी युक्तिवाद केला. आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने ९ महत्त्वाचे साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब, डिजिटल पुरावे आणि सादर करण्यात आलेली कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयीन कामकाजात सरकारी वकिलांना कोर्ट पैरवी पोलीस हवालदार दिलीप सनेर यांनी सहकार्य केले.
शिक्षेचा तपशील
- माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७अ : ५ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड; दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास.
- भादंवि कलम ३५४अ : ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड.
न्यायालयाने आरोपीकडून वसूल करण्यात येणारी दंडाची रक्कम पीडितांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले आहेत.
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना आणि फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सतर्क राहणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिला व मुलींची विटंबना करणाऱ्या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई होऊ शकते, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे.












































