पोलीस प्रवाह न्यूज
श्रीवर्धन : दि. १ – “बालकांचे आरोग्य, योग्य पोषण आणि महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण ही राज्य शासनाची मुख्य प्राथमिकता आहे.भविष्यात सुदृढ आणि सशक्त पिढी घडवायची असेल, तर पोषण अभियानाची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे.ग्रामीण व तळागाळातील प्रत्येक माता आणि बालकांपर्यंत पोषणाचा संदेश तसेच शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा स्वयंसेविकांचे योगदान अत्यंत मोलाचे व कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती रसिका केणी यांनी काढले.
श्रीवर्धन येथील कुणबी समाज भवनात बुधवारी (दि.३०) नववा पोषण अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास व्यासपीठावर बालविकास प्रकल्प अधिकारी.प्रफुल्ल बागल ,विस्तार अधिकारी भरत कुबेर उपस्थित होते.
पुढे बोलताना केणी यांनी स्पष्ट केले की, पोषण अभियानाच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनासाठी शासन स्तरावरून विशेष प्रयत्न केले जात आहेत.स्थानिक स्तरावर सहज उपलब्ध असणारा सकस आहार, पोषणमूल्य असणारे पदार्थ आणि बालकांची नियमित आरोग्य तपासणी यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. केवळ शासकीय पातळीवर नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाने यात सक्रिय सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार तुकाराम सुर्वे , विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष उदय बापट,श्रीवर्धन पंचायत समिती सभापती सुचिन कीर , उपसभापती पुजा शिंदे , जिल्हा परिषद सदस्य वासंती गुणाजी आणि वैभवी कोमनाक तसेच पंचायत समिती सदस्य अस्मिता चोरगे त्याचप्रमाणे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष मंदार तोडणकर , श्रीवर्धन नगरपरिषद उपनगराध्यक्ष अनंत गुरव तसेच रूची बोरकर व साक्षी पाब्रेकर या नगरसेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते अंगणवाडी सेविकांनी उभारलेले पौष्टिक खाद्यपदार्थांचे स्टॉल.विविध पौष्टिक पदार्थांची माहिती देत आरोग्यदायी आहाराचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले.यावेळी एका सुदृढ बालकानेही जंक फूड टाळून पौष्टिक आहाराला प्राधान्य देण्याचा संदेश दिला.












































