पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २- तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद गण सध्या राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने येथे जोरदार मुसंडी मारली आहे. ठाकरे गटाचे अधिकृत जिल्हा परिषद उमेदवार नरेश आहिरे आणि पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार लोणेरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व शिवसेना माणगाव तालुका प्रमुख प्रभाकर ढेपे यांनी सुरू केलेल्या गावभेट दौऱ्याला सर्वत्र उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी जाहीर पाठिंबा, कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह आणि मतदारांचा ओघ पाहता या गणात ठाकरे गटाने निर्णायक आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
सामाजिक बांधिलकी जपणारे दानशूर व्यक्तिमत्त्व आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे नरेश आहिरे यांनी “काम बोलतं” ही भूमिका ठामपणे मांडली आहे. गेल्या अनेक वर्षांत सत्तेत राहूनही जनतेला अपेक्षित विकास न करणाऱ्यांना त्यांनी थेट आव्हान दिले. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, शेतकरी प्रश्न आणि तरुणांसाठी रोजगार या मुद्द्यांवर त्यांनी मांडलेली ठोस विकासात्मक मांडणी मतदारांच्या मनाला भिडत आहे. “समस्या सांगण्यापुरते राजकारण नव्हे, तर उपायांची अंमलबजावणी” हा त्यांचा ठाम संदेश गावागावात पोहोचताना दिसत आहे.पंचायत समितीच्या लढतीत प्रभाकर ढेपे यांना देखील मोठा प्रतिसाद लाभत आहे. लोणेरे ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविताना केलेली प्रभावी कामगिरी, लोकांशी थेट संपर्क आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे गावोगावी त्यांच्याबाबत विश्वास व्यक्त होत आहे. लोणेरे–गोरेगाव विभागात दोन्ही उमेदवारांची जोडी विकासाचा ठोस आराखडा मांडत असल्याने मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या संपूर्ण विभागात एकच चर्चा ऐकू येत आहे. “जिल्हा परिषद सदस्य असा असावा तर नरेश आहिरे यांच्यासारखाच!” विशेषतः तरुण, महिला आणि शेतकरी वर्गातून मिळणारा वाढता पाठिंबा विरोधकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अनेक गावांत कार्यकर्ते आणि मतदार उघडपणे ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठाकरे गटाची मजबूत संघटनशक्ती, तळागाळातील कार्यकर्त्यांची फळी आणि नरेश आहिरे यांची स्वच्छ प्रतिमा यांचा सुरेख मेळ बसल्याने गोरेगाव जिल्हा परिषद गणात सत्तांतराची लाट तयार होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे, विरोधकांकडे ठोस मुद्द्यांचा अभाव जाणवत असून वाढत्या जनसमर्थनामुळे त्यांची धावपळ सुरू झाल्याचे स्पष्ट दिसते. एकूणच, गोरेगाव जिल्हा परिषद गणात ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार नरेश आहिरे यांनी निवडणूक लढत मोठ्या प्रमाणावर आपल्या बाजूने वळवली आहे. ही लढत आता “जनतेचा विश्वास विरुद्ध सत्तेचा अहंकार” अशीच होत असल्याची भावना मतदारांमध्ये बळावत चालली आहे.
































