पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २५- माणगाव तालुका प्रमुखपदाची जबाबदारी रमेश मोरे यांनी स्वीकारल्यानंतर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे. मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण झाली आहे.
तालुक्यातील गावागावांत पक्षाची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, स्थानिक प्रश्नांवर आवाज उठविणे तसेच शिवसैनिकांना एकत्रित आणण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षाच्या बैठका, संघटनात्मक चर्चा आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. शिवसैनिक हीच पक्षाची खरी ताकद या भूमिकेतून सर्वांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या-नव्यांचा समन्वय साधत पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
रमेश मोरे यांनी तालुका प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसैनिकांमध्ये दिसून येणारा उत्साह आगामी काळातील संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. माणगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी सक्रिय होत असून, गावागावांत पक्षाची उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत.
दरम्यान, रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेला नवी दिशा मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












































