माणगाव : दि १९ – लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात (DBATU) प्रतिष्ठित पोस्को फेलोशिप पुरस्कार सोहळ्याची १०वी आवृत्ती मोठ्या उत्साहात पार पडली. या सोहळ्यात विद्यापीठातील विविध अभियांत्रिकी शाखांमधील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना पोस्को फेलोशिप प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याला ८०० अमेरिकन डॉलरची फेलोशिप देण्यात आली.
कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. विनोद मोहितकर, कुलसचिव डॉ. सचिन एम. पोरे, वित्त अधिकारी डॉ. एस. आर. भगत, विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. सरगडे आणि प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी डॉ. नीरज अग्रवाल उपस्थित होते.पोस्को कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक वू सुक चोई, संचालक जी युन पार्क आणि प्रतिभा विकास विभागाचे प्रमुख चिरंजीव मैनी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. विनोद मोहितकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शैक्षणिक यशासाठी चिकाटी, सातत्य, समर्पण आणि कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे सांगितले. ही फेलोशिप केवळ आर्थिक मदत नसून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची आणि कर्तृत्वाची पावती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीलाही बळ मिळते, असे त्यांनी नमूद केले.फेलोशिपचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी लाभार्थ्यांची संख्या आणि फेलोशिपची रक्कम वाढविण्यासह निवडक विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना मांडल्या. यावर पोस्कोचे व्यवस्थापकीय संचालक वू सुक चोई यांनी सकारात्मक भूमिका दर्शवित कंपनीच्या स्तरावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. विकास सरगडे यांनीही पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. DBATU आणि पोस्को यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी विद्यमान सामंजस्य कराराची (MoU) व्याप्ती वाढवावी, तसेच शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि विद्यार्थी प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या करिअर डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने डॉ. नीरज अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. समारोपप्रसंगी कुलसचिव डॉ. सचिन एम. पोरे यांनी पोस्कोचे प्रतिनिधी, विद्यापीठातील मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
पोस्को फेलोशिप पुरस्कार प्राप्त विद्यार्थी :
१. दीया वांद्रे – केमिकल इंजिनिअरिंग
२. तनिष्क दरवेकर – सिव्हिल इंजिनिअरिंग
३. श्रावणी मोरे – सिव्हिल इंजिनिअरिंग
४. अब्दुल्ला ए. ए. हजवाने
५. स्मृती पाटणगे – कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
६. अमेय घरत – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
७. सफवान चिलवान – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
८. कशिश जैन – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
९. सागर दाममी – इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी
१०. तेवस्विनी मोहोटे – माहिती तंत्रज्ञान
११. अथर्व गडगे – माहिती तंत्रज्ञान
१२. ओम कुर्हाडे – मेकॅनिकल इंजिनिअरिंग
१३. प्राची कळमकर – मेकॅनिकल इंजिनिअरिंग
१४. सफरन ए. एस. बंदरकर – पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग
१५. समीक्षा मलुसरे – VLSI
या फेलोशिप सोहळ्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्र आणि विद्यापीठ यांच्यातील शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.












































