पोलीस प्रवाह न्युज
श्रीवर्धन, दि. २९- श्रीवर्धन बस आगारातून सुरू असलेल्या एसटी फेऱ्यांचे प्रवाशांच्या गरजेनुसार फेरनियोजन करावे, अशी मागणी श्रीवर्धन शहरातील नागरिकांच्या वतीने नगरसेवकांनी आगाराकडे निवेदनाद्वारे केली आहे. जुन्या वेळापत्रकाप्रमाणे पूर्वीच्या फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात आणि नागरिकांची मागणी नसलेल्या फेऱ्यांचा फेरविचार करावा, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी उपनगराध्यक्ष अनंत गुरव, शिक्षण सभापती व नगरसेवक बाळकृष्ण गोरनाक, नगरसेविका प्राची बोरनाक, प्रसाद विचारे, प्रणित बोरनाक, हरिदास वाघे, शमा पोरनाक आणि सुप्रिया चोगले उपस्थित होते.
लातूर-बीडच्या दोन फेऱ्यांवर प्रश्नचिन्ह
श्रीवर्धनहून सकाळी ५ वाजता लातूर आणि ५.४५ वाजता बीड या दोन गाड्या पुणे मार्गे जातात. केवळ ४५ मिनिटांच्या अंतराने दोन गाड्या पुण्याकडे सोडण्याची आवश्यकता काय, असा सवाल निवेदनातून करण्यात आला आहे. या दोन्ही गाड्यांना श्रीवर्धनहून लातूर किंवा बीडपर्यंत थेट प्रवासी नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या गाड्यांचा उपयोग प्रामुख्याने पुण्यापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी होत असल्याने सकाळी ६ वाजता एकच पुणे बस सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनात या फेऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सुरू ठेवल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा निवेदनकर्त्यांचा आरोप असून, याबाबत एसटी प्रशासनाची भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
मुंबईच्या जुन्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्याची मागणी
श्रीवर्धनहून मुंबई, नालासोपारा व बोरीवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्वीप्रमाणे म्हसळा मार्गे थेट फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. सकाळी ४, ५ आणि ७ वाजताच्या जुन्या फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात. बोर्ली मार्गे वळसा घातल्याने प्रवाशांचा वेळ व खर्च वाढत असल्याचा आक्षेपही निवेदनात घेण्यात आला आहे.
पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, खोपोलीकडेही गाड्या द्या
श्रीवर्धनहून पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर तसेच पालीमार्गे खोपोली या मार्गांवर बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गांवर गाड्या सुरू केल्यास नागरिकांना सुविधा मिळण्याबरोबरच एसटीच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
सकाळ-सायंकाळ शहरातून राऊंडची मागणी
पूर्वीप्रमाणे सकाळी ८ वाजेपर्यंतच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना आणि सायंकाळी ७ नंतर श्रीवर्धनला येणाऱ्या गाड्यांना शहरातून राऊंड देण्यात यावा. शनिवार-रविवारही ही सुविधा बंद ठेवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार राऊंडच्या वेळी पोलिसांची मदत घ्यावी, असेही निवेदनात नमूद आहे. प्रवाशांची मागणी, प्रत्यक्ष प्रवासी संख्या आणि एसटीचे उत्पन्न यांचा विचार करून फेऱ्यांचे नियोजन करावे; नागरिकांना उपयोगी नसलेल्या फेऱ्यांऐवजी मागणी असलेल्या मार्गांवर बससेवा वाढवावी, अशी ठाम भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे. या मागण्यांवर श्रीवर्धन आगार आणि विभागीय नियंत्रक कार्यालय काय निर्णय घेते, याकडे आता श्रीवर्धनकरांचे लक्ष लागले आहे.
खासदार, पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
श्रीवर्धन आगारातील बसफेऱ्यांबाबत नागरिकांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने आता रायगडचे खासदार आणि पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून श्रीवर्धनकरांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी नागरिक आणि नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. प्रवाशांच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन जुन्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात, अनावश्यक फेऱ्यांचा फेरविचार करावा आणि श्रीवर्धनला अधिक थेट व सोयीची एसटी सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. “नागरिकांना हव्या त्या गाड्या आणि हव्या त्या मार्गांवर सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे; त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून या प्रश्नावर निर्णय घेऊन श्रीवर्धनकरांना न्याय द्यावा,” अशी मागणी होत आहे












































