पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २९- शहरातील खांदाड गाव परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आज समाधानाचे हास्य फुलवणारी एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. कार्यक्षम आणि कार्यतत्पर नगरसेवक प्रशांत साबळे यांनी मोरबा रोडवरील गोद नदीकाठी दुतर्फा सिमेंटचे बाकडे बसवून ज्येष्ठांना दिलासा देणारी मानवतावादी कृती साकारली आहे.
निसर्गरम्य गोद नदी परिसर आणि त्यालगत जाणारा पुणे–माणगाव–दिघी महामार्ग हा परिसर सौंदर्याने नटलेला असला, तरी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची कोणतीही सोय नव्हती. रोज सकाळ-संध्याकाळ आरोग्यासाठी चालायला येणाऱ्या वयोवृद्धांना थकवा आल्यावर विश्रांती घेण्यासाठी जागा नव्हती. ही गरज लक्षात येताच नगरसेवक प्रशांत साबळे यांनी कोणतीही विलंब न करता स्वतःच्या खर्चातून चार सुसज्ज बाकडे उभारून ज्येष्ठांच्या आयुष्यात एक छोटासा पण मोलाचा आधार दिला.
या परिसरातून रीळे, पाचोळे, निळगूण आणि मोर्बा गावांतील अनेक नागरिक दररोज ये-जा करतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बाकडे म्हणजे थकलेल्या पावलांना दिलासा देणारी सावली ठरली आहेत. आता चालताना दम लागला, तर विश्रांतीसाठी एक हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. ही भावना त्यांच्या मनात कृतज्ञतेची ऊब निर्माण करत आहे.
गुरू माऊली संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे हे या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करत म्हणाले, “ज्येष्ठांची गरज ओळखून इतक्या संवेदनशीलतेने केलेले हे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रशांत साबळे यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.”
नगरसेवक प्रशांत साबळे हे नेहमीच नागरिकांच्या हाकेला तत्परतेने प्रतिसाद देणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. खांदाड आणि सिद्धी नगर परिसरात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण केली असून पाणीपुरवठा, वीजपुरवठा, गटार योजना आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. कोरोना महामारी असो किंवा पूरस्थिती प्रत्येक संकटाच्या काळात त्यांनी अहोरात्र मेहनत घेत नागरिकांना आधार दिला आहे. आज बसविण्यात आलेली ही साधी बाकडी फक्त सिमेंटची रचना नसून, ती समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेची आणि माणुसकीची जिवंत उदाहरणे आहेत. ज्येष्ठांच्या थकलेल्या पावलांना आधार देत, त्यांच्या आयुष्यात थोडासा विसावा निर्माण करणारा हा उपक्रम माणगावकरांच्या मनात दीर्घकाळ लक्षात राहील.









































