पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. २३ – माणगाव शहरातील कचेरी रोडवरील तहसीलदार कार्यालयाशेजारी वेदपाठक प्लाझा येथे भारतीय जनता पार्टीच्या माणगाव तालुका मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विधान परिषदेचे आमदार तथा भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी भाजप नेते पंकज तांबे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तालुक्यातील विविध विभागांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी दरेकर यांनी, पंकज तांबे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप, सरकार आणि सर्वसामान्य जनतेमधील दुवा म्हणून काम करावे, असे सांगितले. हे कार्यालय केवळ पक्षाचे कार्यालय न राहता जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे ‘न्यायमंदिर’ ठरावे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा, तसेच शासकीय योजना, विकासकामे, वाहतूक, पायाभूत सुविधा व स्थानिक प्रश्नांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने प्रशासनाशी योग्य समन्वय साधून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही दरेकर यांनी केले. नव्या कार्यालयामुळे तालुक्यातील पक्ष संघटनेला अधिक गती मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला माजी आमदार शाम सावंत, भाजप नेते पंकज तांबे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, ज्येष्ठ नेते नागेंद्र राठोड, जिल्हा चिटणीस संजय अप्पा ढवळे, सहकार सेल अध्यक्ष संजय पंदेरे, युवा नेते चिन्मय मोने, जिल्हा चिटणीस गोविंद कासार, राजू मुंढे, स्वप्निल शिर्के, निजामपूर शहर अध्यक्ष विशाल पाशिलकर, ओमकार मिरगुळे, महेश शिंदे, सोनाली पाखुर्डे यांच्यासह विविध सेल व प्रकोष्ठांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंकज तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि आ. दरेकर यांच्या उपस्थितीत करुणा म्हामुणकर, मयूर यादव, दिनेश म्हसकर, महादेव नाडकर, राजेश शिगवण, रूपेश गायकवाड, राहुल गायकवाड यांच्यासह माणगाव, विळे, पाटणूस, निजामपूर, होडगाव, पळसगाव, रीळे-पाचोळे विभागातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.










































