पोलीस प्रवाह न्युज
सिद्धनेर्ली, दि. २४-: ‘एक परिवार एक फळझाड’ या उपक्रमांतर्गत येथे दि. २३ जून रोजी प्रत्येक घरात एक फळरोप घरपोच करण्यात आले. सह्याद्री देवराईचे प्रमुख व सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता एसटी बसस्थानकापासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत वृक्ष मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शाळेचे विद्यार्थी सर्व ग्रामस्थ सहभागी झाले. या ठिकाणी वृक्षारोपण करून व भाऊसाहेब लाड सर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या या फळरोपांत आंबा, पेरू, सीताफळ, आवळा, कवठ, बेल, चिंच आणि जांभूळ यांचा समावेश आहे. निसर्ग व पर्यावरण संघटना, ग्रामपंचायत, तरुण मंडळे व ग्रामस्थांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सिध्दनेर्ली येथे लोकवर्गणी व लोकसभागातून पाच हजार झाडे गेल्या दोन वर्षांत लावली आहेत. वृक्षारोपण व संगोपनसाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. वाढदिवस, उत्तरकार्य अशा कार्यक्रमावेळी नागरिक वृक्षारोपण करत आहेत. नदी किनारा येथील झाडांना क्यूआर कोड बसविण्याचा अनोखा उपक्रमही येथे राबविण्यात आला आहे.
एक परिवार एक फळझाड या सिद्धनेर्ली गावच्या उपक्रमांचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा असे आवाहन सयाजी शिंदे यांनी यावेळी केले. यावेळी सरपंच दत्तात्रय पाटील, मधुकर येवलुजे, कॉम्रेड शिवाजी मगदूम, युवराज खदरे सर यांनी मनोगते सादर केली तर मोरबाळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.





































