पोलीस प्रवाह न्यूज
रायगड : दि. १२ – पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या तसेच आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी यांच्या तालुकानिहाय बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकींद्वारे स्थानिक स्तरावर पक्षाची बांधणी, संघटनात्मक आढावा आणि पुढील दिशा यावर चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मा. प्रांताध्यक्ष हर्षवर्धनची सपकाळ यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष, संघटक तथा प्रभारी प्रशासक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक १३ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता महाड आणि पोलादपूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची, नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे ठिकाण निश्चित करण्यासाठी संबंधित प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी त्वरित विचारविनिमय करून बैठकस्थळ निश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता तळा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, तळा शहरात बैठकीचे स्थळ निश्चित करून त्याबाबत सर्व संबंधितांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच संध्याकाळी ६.०० वाजता माणगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे ठिकाण माणगाव शहरात निश्चित करून त्याची माहिती सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सर्व बैठकींविषयी पक्षातील सर्व काँग्रेस जनांपर्यंत दूरध्वनीद्वारे माहिती पोहोचविण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी पार पाडावी, असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांचकडून करण्यात आले आहे. संघटनात्मक पातळीवर अधिक संवाद, समन्वय आणि सक्रियता वाढविण्याच्या दृष्टीने या बैठका महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.












































