पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. २७- करमाळा पोलीस ठाण्याने कौतुकास्पद कामगिरी करीत एक पिस्टल व दोन जिवंत राउंड जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक करमाळा रणजीत माने व त्यांचे पथकांनी सदरील कारवाई केली आहे.
यात हकीकत अशी कि, दि २५ सप्टेंबर रोजी नवरात्रौत्सव अनुषंगाने रात्री करमाळा शहरात पेट्रोलिंग करीत असताना पो. कॉ. अर्जुन गोसावी यांना गोपनिय बातमी मिळाली कि, मौलाली माळ करमाळा येथे एक इसम कमरेस पिस्टल लावुन संशयास्पद स्थितीत फिरत आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना बोलावून घेवून सदर माहीती व सुचना देवून योग्य ती कायदेशीर कारवाई करबाबत आदेश देऊन रवाना होण्याबाबत आदेश देण्यात आले.
त्यावेळी सदर पथकातील पोना मनिष पवार यांनी दोन इसमांना पंच म्हणुन बोलावून घेवून त्यांना सोबत घेवून सदरचे पथक हे मौलाली माळ, करमाळा येथे जावून तेथे बराच वेळ त्याचा शोध घेतल्यानंतर अंधारात एका लाईटच्या खांबाच्या उजेडात एक इसम मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयीत रित्या फिरत असताना दिसुन आला. त्यावेळी तो सदर पथकास पाहताच कावराबावरा होवून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकातील पोलीसांनी त्यास जागीच पकडले. त्यावेळी सोबत असलेल्या पंचासमक्ष त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आमिन रशिद बेग, वय ३३ वर्षे रा. मौलाली माळ, करमाळा ता. करमाळा, जि. सोलापुर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन पितळी धातूचे जिवंत राउंड असा एकूण ५०,०००/- किंमतीचा मुददेमाल मिळून आला. मिळून आलेल्या पिस्टल व रांउडबाबत आरोपीस सदर पिस्टल व जीवंत रांउड याबाबत आपल्याकडे जवळ बाळगण्याचा परवाना आहे अगर कसे असे विचारले असता त्याने तसा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
सदर आरोपीस व मुददे मालासह पोलीस ठाण्यात आणुन सदर इसमाविरुध्द करमाळा पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीचा अभिलेख पाहीला असता आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द दरोड्याचा प्रयत्न, एन डी पी एस अॅक्ट अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास हा पोलीस हवालदार अजित उबाळे हे करीत आहेत.



































